Join us  

संहिता जोशीने चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी घटवले २५ किलो वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 4:03 PM

नवोदित अभिनेत्री संहिता जोशीनेदेखील तिच्या ‘माधुरी’ या पहिल्यावाहिल्या मराठी चित्रपटासाठी दमदार मेहनत घेतली आहे. त्यासाठी तिने तब्बल २५ किलो वजन घटवले असल्याची बातमी आहे. 

मराठी चित्रपटसृष्टीत आज अनेक नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. मराठी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी ही मंडळी भरपूर मेहनत घेताना दिसून येतात. नवोदित अभिनेत्री संहिता जोशीनेदेखील तिच्या ‘माधुरी’ या पहिल्यावाहिल्या मराठी चित्रपटासाठी दमदार मेहनत घेतली आहे. त्यासाठी तिने तब्बल २५ किलो वजन घटवले असल्याची बातमी आहे. 

संहिता ही खूप मेहनती असल्याकारणामुळे, सिनेमातील आपल्या भूमिकेसाठी स्वतःमध्ये तिने अनेक बदल घडवून आणले. विशेष म्हणजे त्यासाठी संहिता दररोज दीड तास जिममध्ये घाम गाळत होती. शिवाय संध्याकाळी ६. ३० नंतर तिने जेवण पूर्णपणे वर्ज्य केले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संहिता ही मधुमेहीग्रस्त असूनदेखील तिने योग्य पथ्यपाणी करत आपले वजन नियोजित वेळेमध्ये कमी करून दाखवले. वास्तविकरित्या मधुमेह असलेल्या लोकांचे वजन शक्यतो कमी होत नसते, मात्र संहिताने ते शक्य करून दाखवले. याबद्दल बोलताना संहिता सांगते की, 'वजन कमी करण्यासाठी मी खूप मेहनत घेत होते. मात्र, त्यादरम्यान माझ्या शरीरातील साखरेची पातळी भरपूर वाढली असल्याचे मला समजले आणि मला धक्काच बसला. त्यामुळे वजन कमी करण्याआधी शुगर कंट्रोल करण्याचे आव्हान माझ्यासमोर होते. त्यानुसार योग्य पथ्यपाणी करून शुगर लेव्हल कमी केली आणि त्यानंतर वजन कमी करणे शक्य झाले.'

सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशीची संहिता मुलगी असल्याकारणामुळे ती देखील तिच्या आईसारखी चोखंदळ आहे. त्यामुळे तिने घेतलेल्या या मेहनतीचा तिला नक्कीच फायदा होईल. 

नुकतेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून ‘मुंबापुरी प्रॉडक्शन’चे मोहसिन अख्तर यांनी ‘माधुरी’ या त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली होती. ‘मुंबापुरी प्रॉडक्शन’चे मोहसिन अख्तर निर्मित ‘माधुरी’ या चित्रपटात पुरस्कार विजेती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिका साकारणार आहे. सोनाली कुलकर्णी यांनी एकापेक्षा एक अप्रतिम भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे, त्यामुळेच माधुरी चित्रपटामधील सोनाली कुलकर्णींची भूमिका पाहण्यासाठी त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक असतील. एका अनमोल आणि सुंदर नात्यावर गुंफलेल्या ‘माधुरी’ चित्रपटात सोनाली कुलकर्णीसह अभिनेता शरद केळकर देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.  

टॅग्स :माधुरी चित्रपट