Join us  

...अन् विजय सेतुपतीसमोर सईची बोबडीच वळली! अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा; म्हणाली, "त्यांनी मला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 6:53 PM

"विजय सेतुपती समोर बसलेत आणि माझ्या तोंडून वाक्य निघत नव्हतं", सईने सांगितला 'तो' अनुभव

बोल्ड अँड ब्युटिफूल सई ताम्हणकर मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. सईने मराठीबरोबरच बॉलिवूडमध्येही तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला. 'मीमी', 'दुनियादारी', 'हंट', 'तु ही रे', 'नो एन्ट्री' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. आता 'श्रीदेवी प्रसन्न' या सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सईने नुकतीच 'लोकमत फिल्मी'च्या 'नो फिल्टर' शोमध्ये हजेरी लावली होती.

या मुलाखतीत सईने सिनेसृष्टीतील कलाकारांबरोबर काम करण्याचे अनुभव सांगितले. यावेळी तिने दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपथीबरोबरचा एक किस्साही सांगितला. ती म्हणाली, "'नवरसा'मध्ये मी विजय सेतुपतींबरोबर काम केलं होतं. तेव्हा माझ्या भाषेचा प्रॉब्लेम होता. मी डायलॉग रट्टा मारुन गेले होते. त्यातले तीनच डायलॉग तसेच राहिले. बाकी ६ डायलॉग नवीन आले. मी पहिले ३ टेक मख्खं मुलीसारखी बसले होते. माझ्या तोंडून एक शब्द फुटत नव्हता. माझ्या शेजारी बसलेली मुलगी माझ्या मैत्रिणीची भूमिका साकारणार होती. बिजॉय नाम्बियार दिग्दर्शक होता. मी बिजॉयला म्हणाले की तिला माझी भूमिका करू दे. माझ्याने हे होईल असं वाटत नाही. तेव्हा संपूर्ण सेटसमोर बिजॉय मला ओरडला आणि म्हणाला तू तुझा जॉब करत सई. हे विजय सरांच्या लक्षात आलं."

"समोर विजय सेतुपथी बसलेत आणि तीन टेक झाले तरी माझ्या तोंडून वाक्य निघत नव्हतं. मला खूप टेन्शन आलं होतं. इथून मला बाहेर काढा मी कुठेतरी पळून जाते, असं मला वाटत होतं. विजय सरांनी ते पाहिलं आणि मला म्हणाले, मी जेव्हा हिंदी बोलतो तेव्हा मला असंच होतं. त्यामुळे काळजी करू नकोस. मी तुला एक ट्रिक सांगतो. ती फॉलो कर मग आपला टेक ओके होईल. त्यांनी मला ट्रिक सांगितली. मी ती फॉलो केली आणि दुसरा टेक ओके झाला. मला वाटतं की एखादा माणूस कुठल्या जागी काम करतोय आणि त्याचं वागणं काय आहे. याचं काही कनेक्शन नसतं आणि ते नसावं," असंही पुढे सई म्हणाली. 

'नवरसा' ही एक सीरिज आहे. २०२१ साली नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजमध्ये सईने विजय सेतुपतीबरोबर स्क्रीन शेअर केली होती. यामध्ये सूर्या, अरविंद स्वामी, प्रकाशराज अशी स्टार कास्ट होती.  

टॅग्स :सई ताम्हणकरTollywood