Join us  

​सचिन पिळगांवकर यांना जीवन गौरव पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2017 10:29 AM

सचिन पिळगावकर हे आज केवळ मराठी चित्रपटसृष्टीतीलच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतीलदेखील एक महत्त्वाचे नाव मानले जाते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ...

सचिन पिळगावकर हे आज केवळ मराठी चित्रपटसृष्टीतीलच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतीलदेखील एक महत्त्वाचे नाव मानले जाते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक सरस चित्रपट दिले आहेत. मराठी आणि हिंदीसोबतच त्यांनी गुजराती, भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये काम केले आहे. केवळ एक अभिनेते म्हणूनच नव्हे तर त्यांनी एक निर्माता, दिग्दर्शक, गायक, सूत्रसंचालक, एक उत्कृष्ट डान्सर अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सचिन यांनी खूपच कमी वयात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सचिन यांची आज पन्नास वर्षांहूनही अधिक वर्षांची कारकीर्द आहे. ही कारकीर्द लक्षात घेऊन त्यांना एका संस्थेकडून नुकताच जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे. मालिका, चित्रपट, रिअॅलिटी शो अशा तिन्ही क्षेत्रात सचिन पिळगांकर यांनी आपली हुकमत दाखवलेली आहे. त्यांनी वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर नच बलिये या कार्यक्रमात भाग घेतला आणि या कार्यक्रमाचे विजेतेपद मिऴवले. त्यांनी बालकलाकार म्हणून हा माझा मार्ग एकला या चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. गीत गाता चल, बालिका वधू, अखियों के झरोके से, नदीया के पार अशा अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अशी ही बनवा बनवी, नवरी मिळे नवऱ्याला यांसारख्या त्यांच्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. त्यांनी तू तू मैं मैं या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले होते. हा कार्यक्रम आज इतक्या वर्षांनीदेखील प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. सचिन यांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांना अधोरेखित करण्यासाठी हा माझा मार्ग एकला हे आत्मचरित्र लिहिले होते.