Join us

​सुरक्षित अंतर ठेवा या नाटकाद्वारे सचिन देशपांडे करणार रंगभूमीवर कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 15:45 IST

सचिन देशपांडेने तीन वर्षांपूर्वी एकाच क्षणात या नाटकात काम केले होते. या नाटकातील त्याच्या भूमिकेचे आणि या नाटकाचे चांगलेच ...

सचिन देशपांडेने तीन वर्षांपूर्वी एकाच क्षणात या नाटकात काम केले होते. या नाटकातील त्याच्या भूमिकेचे आणि या नाटकाचे चांगलेच कौतुक झाले होते. पण सचिन गेल्या काही वर्षांपासून मालिकांमध्ये व्यग्र आहे. तो सध्या काहे दिया परदेस या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहे. याआधी त्याने सखी या मालिकेत काम केले होते. मालिकांच्या चित्रीकरणामुळे त्याला  नाटकाला वेळच देता येत नव्हता. पण आता तो सुरक्षित अंतर ठेवा या नाटकाद्वारे रंगभूमीवर परतणार आहे. या नाटकात त्याच्यासोबतच पुष्कर श्रोती, तन्वी पालव, निखिल राऊत, माधवी निमकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या नाटकाविषयी सचिन सांगतो, "नाटक हे माझे कधीही पहिले प्रेम आहे. तुम्ही मालिका करत असताना तुम्हाला प्रचंड लोकप्रियता मिळते हे खरे आहे. पण नाटक करण्याची गंमतच वेगळी असते. मी कित्येक वर्षांनंतर माझ्या पहिल्या प्रेमाकडे वळत आहे. सुरक्षित अंतर ठेवा हे एक विनोदी नाटक असून लग्नाशी संबंधित या नाटकाचा विषय आहे. मी आणि तन्वी, निखिल आणि माधवी अशी जोडपी रसिकांना या नाटकात पाहायला मिळणार असून पुष्कर एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. लव्ह मॅरेज योग्य की अरेंज मॅरेज योग्य असा या नाटकाचा विषय आहे. या नाटकात या गोष्टीचा निकाल आम्ही नव्हे तर नाटक पाहायला येणारे प्रेक्षक देणार आहेत. ते या गोष्टीचे परीक्षक असणार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रयोगाला याचे उत्तर वेगवेगळे मिळणार आहे. हीच या नाटकाची खरी गंमत आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रणित कुलकर्णी यांनी केले आहे."