नगरसेवकमध्ये बेला शेंडे आणि कुणाल गांजावालाने गायले रोमँटिक गीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 19:00 IST
आजवर मराठीमध्ये अनेक हिट गाणी देणारे कुणाल गांजावाला आणि बेला शेंडे मराठी रसिकांसाठी एक प्रेमगीत घेऊन येत आहेत. कुणालने ...
नगरसेवकमध्ये बेला शेंडे आणि कुणाल गांजावालाने गायले रोमँटिक गीत
आजवर मराठीमध्ये अनेक हिट गाणी देणारे कुणाल गांजावाला आणि बेला शेंडे मराठी रसिकांसाठी एक प्रेमगीत घेऊन येत आहेत. कुणालने मराठीसोबत हिंदी चित्रपटांमध्येदेखील अनेक हिट गाणी गायली आहेत. अनेक गीतांतून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या आवाजाची छाप पाडणाऱ्या कुणाल गांजावाला व बेला शेंडे यांनी नगरसेवक एक नायक या आगामी मराठी चित्रपटासाठी एक रोमँटिक गीत गायले आहे. ‘जश पिक्चर्स प्रस्तुत’ शशिकांत चौधरी व जयश्री चौधरी निर्मित नगरसेवक हा मराठी चित्रपट ३१ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.‘मन कावरं बावरं आज का ते कुणावर मना सावर सावर, का लाज गालावर’! असे या गाण्याचे बोल असून हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. सहज ओठांवर रुळतील असे या गीतांचे शब्द आहेत. या गीताची चालदेखील आजच्या पिढीला रुचेल अशी रचण्यात आली आहे. गीतकार अभिजित कुलकर्णी यांनी हे गीत शब्दबद्ध केले असून संगीतकार देव आशिष यांनी हे गीत संगीतबद्धकेलं आहे. या गीताविषयी बोलताना कुणाल आणि बेला सांगतात, "हे ड्युएट गीत गाताना एक वेगळाच मूड जमून आला होता. आम्ही यापूर्वी गायलेली गाणी जशी संगीतप्रेमींच्या ओठांवर सहज रुळली तसे हे गाणेही ओठांवर रुळणारे आहे."दीपक कदम दिग्दर्शित या चित्रपटात उपेंद्र लिमये, नेहा पेंडसे, सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे, संजय खापरे, विजय निकम, श्याम ठोंबरे, सविता मालपेकर, त्रियोगी मंत्री, प्रियांका नागरे, अभिजित कुलकर्णी, यश कदम, वर्षा दांदळे, मयुरी देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.