Join us

मकरंद अनासपूरे मुस्लिम शेतकऱ्याच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2016 15:45 IST

'रंगा पतंगा' छपडनेको मंगता' हे मागणं १ एप्रिलला पूर्ण होणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपट ...

'रंगा पतंगा' छपडनेको मंगता' हे मागणं १ एप्रिलला पूर्ण होणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे मानाचे पुरस्कार पटकावलेला 'रंगा पतंगा' हा बहुचर्चित चित्रपट १ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि विश्वास मीडिया अँड एंटरटेन्मेंट  यांनी निर्मिती केलेला हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवर संस्था बिपीन शहा मोशन पिक्चर्स प्रस्तुत करत आहे. 'रंगा पतंगा' या चित्रपटात विदर्भातील एका मुस्लिम शेतकऱ्याची गोष्ट उलगडण्यात आली आहे. आजुबाजूचा भवताल बदलत असताना शेतकऱ्याला सोसाव्या लागणाऱ्या समस्यांचे चित्रण हा चित्रपट करतो. नर्मविनोदी पद्धतीनं कथानक उलगडताना सध्याच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर आणि व्यवस्थेतील अनागोंदीवर हा चित्रपट मार्मिक पद्धतीनं भाष्य करतो. आतापर्यंत दुष्काळ, शेतकऱ्यांचं जीवन, समस्या दाखवणारे अनेक चित्रपट येऊन गेले असले, तरी त्यात 'रंगा पतंगा' नक्कीच वेगळा ठरणार आहे.विनोदी भूमिकांमुळे प्रसिद्ध असलेले अभिनेता मकरंद अनासपुरे जुम्मन या मुस्लिम शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत जुम्मनची व्यक्तिरेखा  महत्त्वाची ठरणार आहे. या भूमिकेसाठी त्यांचा लुक वैशिष्ट्यपूर्ण आहे. मकरंद अनासपुरे आणि संदीप पाठक यांच्या अभिनयाचा वेगळाच पैलू या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. तसंच नंदिता धुरी, गौरी कोंगे, भारत गणेशपूरे, सुहास पळशीकर, अभय महाजन, तेजपाल वाघ, हार्दिक जोशी, उमेश जगताप, आनंद केकाण आदींनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाची कथा चिन्मय पाटणकर यांनी लिहिली आहे. तर, पटकथा-संवाद लेखनासह प्रसाद नामजोशी यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटातून प्रसाद नामजोशी दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. यापूर्वी त्यांनी बऱ्याच शॉर्टफिल्म्स, डॉक्युमेंट्री केल्या आहेत. शॉर्टफिल्म निर्मितीसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या  ह्यशॉर्टकटह्ण या त्यांच्या पुस्तकाला राज्य पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.अनेक मराठी-हिंदी चित्रपट चित्रित करण्याचा अनुभव असलेल्या अमोल गोळे यांनी फ्लाईंग गॉड फिल्म्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्याबरोबरच सिनेमॅटोग्राफीची जबाबदारीही निभावली आहे. अमोलसह विश्वास मीडिया अँड एंटरटेन्मेंटचे राजेश डेंपो, माधवी समीर शेट्टी हे निर्माते असून, सुजाता अनंत नाईक, दिलीप गेनुबा गोळे हे सहनिर्माते आहेत.  राष्ट्रीय पुरस्कार विजेता अनमोल भावे यांनी साऊंड डिझायनिंग, सागर वंजारी यांनी संकलन, ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार यांनी गीतलेखन आणि प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीत व पार्श्वसंगीत केलं आहे. आदर्श शिंदे यांनी गाणी गायली आहेत. रश्मी रोडेनं वेशभूषा आणि श्रीकांत देसाई यांनी रंगभूषा केली आहे.