Join us  

संगीतकारांची ओळख करुन देत रितेशकडून 'माऊली' सिनेमाचं हटके लॉन्चिंग, हे संगीतकार रसिकांना पुन्हा लावणार ‘याड’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 7:28 AM

पडद्यामागील कलाकारांना अशाप्रकारे पडद्यावर स्‍थान दिल्‍याबद्दल रसिकांकडून रितेशचे कौतुक होत आहे. संगीतकारांना असा आदर दिलेला पाहून रितेशबद्दलही आदर वाढल्याच्या प्रतिक्रिया रसिकांकडून व्यक्त होत आहेत.

हाथ भारी.... सगळंच लय भारी, या डायलॉगने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचा पहिलावहिला मराठी सिनेमा 'लय भारी' सिनेमातील या डायलॉगने मराठी मनावर आणि तरुणाईवर जादू केली होती. रुपेरी पडद्यावरील रितेशचा अभिनय रसिकांना चांगलाच भावला होता. त्यामुळेच की काय या सिनेमाने तिकीट खिडकीवर कमाईचे नवनवे रेकॉर्ड्सही रचले होते. 'लय भारी' सिनेमातील रितेशने साकारलेला 'माऊली' रसिकांच्या काळजात घर करुन गेला होता. लय भारी या सिनेमाच्या यशामुळे रितेशच्या दुस-या मराठी सिनेमाची रसिकांना उत्सुकता लागली होती. हिंदीत विविध सिनेमात झळकणारा रितेश मराठीत पुन्हा एकदा कधी दिसणार असा प्रश्न रसिकांना पडला होता. आता रसिकांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण रितेशचा दुसरा मराठी सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. माऊली असं या सिनेमाचं नाव असेल. या सिनेमाची रितेशने हटक्या स्टाईलमध्ये घोषणा केली. आजवर सिनेमाच्या टीझरमध्ये अभिनेता आणि अभिनेत्रीची ओळख करुन त्या सिनेमाची उत्कंठा वाढवली जाते. मात्र नेहमीच काहीतरी हटके प्रयोग करणाऱ्या रितशने त्याच्या माऊली या सिनेमाचं हटके लॉन्चिंग केले. त्याने या सिनेमातील नायक किंवा नायिका यांची ओळख करुन न देता सिनेमाच्या संगीतकारांची ओळख करुन देत रसिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करुन नवी परंपरा सुरु केली आहे. या सिनेमाचे संगीतकार असणार आहे महाराष्ट्राची लाडकी जोडी अजय-अतुल. या भावांच्या जोडीने अवघ्या महाराष्ट्राला आपल्या संगीताच्या तालावर थिरकायला लावत याड लावलं. 'सैराट' असो किंवा 'लय भारी' या जोडगोळीच्या संगीताने मराठी रसिकांवर जादू केली आहे. त्यामुळेच माऊली या सिनेमाचे संगीतकार म्हणून रितेशने या जोडीला पहिली पसंती दिली आणि त्यांची ओळख करुन देत माऊली सिनेमाचं लॉन्चिंग केलंय.या व्हिडिओमध्‍ये रितेश विचारतो की, 'माऊली' या सिनेमाचे संगीतकार कोण आहेत माहिती का तुम्‍हाला?' नंतर धुमधडाक्‍यात तो अजय-अतुलची ओळख करून देतो. सिनेमा निर्मितीमध्ये अनेकांचं योगदान असतं. त्या प्रत्येकाला आदर, सन्मान आणि ओळख मिळायला हवी असं रितेशला वाटतं. त्यातच अजय-अतुल यांच्या संगीताने सिनेमा नवी उंची गाठतो. या दोघांनी सिनेमात संगीतासह मोठ्या प्रमाणात सृजनात्मक मूल्यं दिली आहेत असंही त्याने म्हटले आहे. त्यामुळेच की काय माऊली सिनेमासाठी रितेशने नायक किंवा नायिकेपेक्षा अजय-अतुल यांना अधिक महत्त्व दिलं.पडद्यामागील कलाकारांना अशाप्रकारे पडद्यावर स्‍थान दिल्‍याबद्दल रसिकांकडून रितेशचे कौतुक होत आहे. संगीतकारांना असा आदर दिलेला पाहून रितेशबद्दलही आदर वाढल्याच्या प्रतिक्रिया रसिकांकडून व्यक्त होत आहेत.