दिग्दर्शनाचे कोंदण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:56 IST
स्वप्ना जोशी दिग्दर्शित आणि संजय लीला भन्साली प्रथमच निर्मित करत असलेल्या आगामी मराठी चित्रपटात मराठी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसाठी कथा आणि ...
दिग्दर्शनाचे कोंदण
स्वप्ना जोशी दिग्दर्शित आणि संजय लीला भन्साली प्रथमच निर्मित करत असलेल्या आगामी मराठी चित्रपटात मराठी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसाठी कथा आणि पटकथेचा एक नवीन फॉरमॅट तयार होताना दिसणार आहे. अर्थातच हे काहीतरी वेगळं आणि इंट्रेस्टिंग असणार आहे. यामध्ये संजय लीला भन्साली या नावाशी जोडल्या गेलेल्या गोष्टी म्हणजे, ग्रॅंड वेअर, लूक, म्युझिक, लार्जर दॅन लाईफ सीन या सगळ्या घटकांचा समावेश या चित्रपटात असणार आहे. संपूर्ण चित्रपट आपल्या दिग्दर्शनाने रंगून टाकणारे हिंदीतील प्रसिध्द दिग्दर्शक संजय लिला भन्साळी प्रथमच मराठी चित्रपट करत आहेत. या महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी नायकाच्या भूमिकेच्या शोधाचा प्रवास मराठीतील चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीपासून सुरू झाला आणि स्वप्नीलपर्यंतच संपला. मात्र, स्वप्नीलसाठी हे मोठे शिवधनुष्य पेलण्यासारखे ठरणार आहे. आजपर्यंत स्वप्नीलने अनेक प्रसिद्ध चित्रपट केले; स्वत:चा खास प्रेक्षकवर्ग निर्माण केला. मात्र, स्वत:तील अभिनेत्याला सिद्ध करण्याची संधी त्याला फारशी मिळाली नाही. अभिनेत्यांकडून त्याच्यातील 'बेस्ट'काढून घेण्यात माहीर असलेल्या संजय लिला भन्साळी यांच्या दिग्दर्शनात ही संधी स्वप्नीलला मिळणार आहे.वयाच्या ९व्या वर्षी रामायण मालिकेत कुशची भूमिका त्याने साकारली, आणि तिथेच त्याच्या करिअरची गाडी सुरू झाली ती आजपर्यंत त्याचे अनेक दमदार चित्रपट बॉक्स ऑफिसवर करोडोंचा बिझनेस करत आहेत, असा हा मराठीतील चॉकलेट बॉय स्वप्नील. रामायणातील कुशनंतर अमानत, हद्द कर दी, भाभी, तेरे घरच्या समोर अशा अनेक मालिका तर 'गुलाम-ए-मुस्तफा', 'दिल विल प्यार व्यार' अशा चित्रपटात त्याने विविध भूमिका साकारल्या. पण त्याला खरा ब्रेक मिळाला तो अधुरी एक कहाणी या मालिकेतील मुख्य भूमिकेनंतर. त्या मालिकेतून मराठी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला एक नवा चेहरा सापडला आणि त्यानंतर चेकमेट, आम्ही सातपुते, मुंबई-पुणे-मुंबई, दुनियादारी, मंगलाष्टक वन्स मोअर, पोरबाजार, प्यारवाली लव्ह स्टोरी, वेलकम जिंदगी, मितवा, तू हि रे असे एक से बढकर एक चित्रपट त्याने दिले. आता याच मराठीतील चॉकलेट बॉयला बॉलिवूडमधील दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक, संगीतकार अशा अनेक बिरूदावल्या मागे असलेल्या आणि प्रथमच मराठी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये निर्मिती क्षेत्रातून पाऊल टाकणार्या भन्साळी यांच्या भन्साळी प्रॉडक्शन्स आणि सबिना खान प्रॉडक्शन्स निर्मित करत असलेल्या आगामी चित्रपटात लीड रोल साकारायची संधी मिळाली आहे. स्वप्नीलला मिळालेल्या या सुवर्णसंधीबद्दल 'सीएनएक्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या भावना शेअर केल्या. ''संजय लीला भन्सालींच्या चित्रपटात काम करण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार झगडत असतात. पण त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत यायचं ठरवलं, त्यांनी मी यापूर्वी केलेलं काम पाहिलं आणि मला या चित्रपटात लीड रोलसाठी घ्यायचं ठरवलं. ही माझ्यासाठी खरोखरीच सुवर्णसंधी आहे आणि इतक्या मोठय़ा माणसाला माझ्याबरोबर काम करावसं वाटणं, हे माझं भाग्य आहे. त्यांनी मी केलेल्या कामाची दखल घेतली, त्यामुळे ही संधी माझ्यासाठी कोणत्याही अँवॉर्डपेक्षा कमी नाही, ही तर शाबासकीची थाप आहे.