आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. सोशलमीडियामध्ये तरुणाई हा दिवस साजरा करतेच. परंतु देशभक्ती दाखविण्यासाठी केवळ प्रजासत्ताक दिन अथवा स्वातंत्र्य दिन हेच असावेत का? देशाच्या कार्यात प्रत्येक नागरिकाने हातभार लावला पाहिजे, असे सर्वांनाच वाटते. मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांना देशभक्तीविषयी काय वाटते, त्यांचा काय संदेश आहे, याबाबत सीएनक्सने घेतलेल्या या प्रतिक्रिया...सोनाली कुलकर्णी - १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन दिवस फक्त सोशल मीडियापुरता मर्यादित नसावेत. कारण या दोन दिवशी प्रत्येक नागरिकांचे प्रेम सोशल मीडियावर पाहायला मिळते. सामाजिक माध्यमांव्यतिरिक्त या दोन दिवशी समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी करण्याचा संकल्प करावा. त्याचबरोबर तो शंभर टक्केदेखील अंमलात आणण्याचा प्रयत्न करावा. सिध्दार्थ जाधव - देशभक्ती व्यक्त करण्यासाठी प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिन यांचे औचित्य साधू नये. या दिवशी आपल्या संरक्षणासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणाºया सैनिकांचे स्मरण करावे. त्याचप्रमाणे त्यांचे आभारदेखील मानावेत. प्रत्येक नागरिकाने या सैनिकांना मनापासून सपोर्ट करावा अशी माझी इच्छा आहे. त्याचबरोबर एक नागरिक म्हणून देशाच्या स्वच्छतेविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे.प्रिया बापट - स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हेच देशाचा अभिमान बाळगण्याचे दिवस का असावेत हा प्रश्न मला नेहमी पडतो. प्रत्येक नागरिकाने देश स्वच्छ ठेवून, जबाबदारीची जाणीव बाळगून रोजच आपली देशभक्ती व्यक्त करावी. त्याचबरोबर या दिवशी आपण प्रत्येकजण झेंडे विकत घेतो. ते विकत घेतल्यानंतर तो कुठे ही न टाकता त्याचा योग्य सांभाळ करावा. झेंडाचा अपमान होणार नाही याची काळजी देशाचे एक नागिरक म्हणून प्रत्येकाने घेतली पाहिजे. सौरभ गोखले - या दिवशी मी खास सांगेन की, देशाचे नागरिक म्हणून २६ जानेवारी आपण का साजरी करतो हे जाणून घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कारण माझ्या मते, फक्त ८० टक्के नागरिकांना हा दिवस का साजरा करतो याची माहिती आहे. त्याचबरोबर हा दिवस सुट्टीचा आहे याकडे न पाहता, या दिवशी सोसायटीमध्ये एकत्रित येऊन समाजकार्य करून देशाच्या विकासामध्ये हातभार लावावा असे मला वाटते. पर्ण पेठे - देशाचे एक जबाबदार नागरिक म्हणून काही कर्तव्य पूर्ण पाळण्यासाठी अगदी छोटया गोष्टींपासून सुरूवात करावी असे मला वाटते. प्रत्येक रस्ता, किल्ला, पर्यटन स्थळे या ठिकाणी कचरा करू नये. आपल्या अवतीभोवती कचरा पेटी नावाची एक गोष्ट असते हे लक्षात ठेवावे. कचरा हा कचरा पेटीतच टाकावा अशीच मानसिकता प्रत्येकाने तयार केली पाहिजे.
देशभक्तीसाठी प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाचे औत्सुक्य नसावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 17:52 IST