Join us  

"मंगेशकरांना का पैसे द्यायचे?" लोकांकडे काम मागितल्यावर राधा मंगेशकर यांना आला विचित्र अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 5:00 PM

आत्यांसारखा आवाज नाही म्हणून राधा मंगेशकर यांच्या गायनाला लोकांनी कायमच ट्रोल केलं.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची लेक आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भाची राधा मंगेशकर यांनी नुकतंच मोठा खुलासा केला. मंगेशकर कुटुंबात जन्माला येऊनही राधा मंगेशकर यांचा स्वत:चा स्ट्रगल खूप वेगळा आहे. आत्यांसारखा आवाज नाही म्हणून राधा मंगेशकर यांच्या गायनाला लोकांनी कायमच ट्रोल केलं. याचा त्यांच्यावर काय परिणाम झाला हे नुकतंच त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

गायिका राधा मंगेशकर यांचा आवाज हा लता दीदी आणि आशाताईंसारखा नाही असं नेहमीच म्हणलं जातं. राधा मंगेशकरांच्या गायनावर कायम टीकाच झाली. 'मित्र म्हणे' या युट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत  त्या म्हणाल्या, "मी जेव्हा लोकांकडे काम मागितलं की मला गायला बोलवा किंवा मला तुमच्या शोमध्ये गायला घ्या. तेव्हा सर्वात आधी तर लोकांचं हेच म्हणणं होतं की तुम्हाला काय गरज? दुसरं जर समजा घेतलं तर ही माझी फीस आहे तर ते म्हणायचे तुम्हाला काय पैशाची गरज आहे? हा सगळ्यात मोठा जोक होता. मंगेशकरांना काय पैसे द्यायचे? नंतर नाही तुझं गाणं आवडत किंवा नाही तुझा आवाज आवडत ही सुद्धा टीका झाली."

त्या पुढे म्हणाल्या,'सुरुवातीला मी स्टेजवर गात असताना लोकं खालून हुटिंग करायचे. असं दोनतीनदा झाल्यावर मी काही वर्ष गायनातून ब्रेक घेतला होता. पण माझा रियाज सुरु होता. नंतर मी जेव्हा परत गायला लागले तेव्हा टीका थोडी कमी झाली होती. पण लोकांनी आजपर्यंत माझ्या गाण्याचा स्वीकार केलेला नाही. एका वर्तमानपत्रात तर मंगेशकरांवर कोणीतरी लेख लिहिला होता. तेव्हा त्याने त्याने माझ्याविषयी लिहिले की जेव्हा राधा मंगेशकर गायला लागतात तेवढ्यावेळात मी उठून बाहेर जातो. ते वाचून खूप वाईट वाटलं होतं."

टॅग्स :हृदयनाथ मंगेशकरलता मंगेशकरमराठी गाणीआशा भोसले