Join us

गिरीश ओक यांच्या झालेल्या अपमानाविषयी कलाकारांनी सोशलमीडियावर व्यक्त केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 15:06 IST

सिंधुदुर्ग येथे अभिनेता गिरीश ओक यांचा  घोर अपमान करण्यात आला आहे. हो, तुझे आहे तुजपाशी या आपल्या नाटकाच्या प्रयोगासाठी ...

सिंधुदुर्ग येथे अभिनेता गिरीश ओक यांचा  घोर अपमान करण्यात आला आहे. हो, तुझे आहे तुजपाशी या आपल्या नाटकाच्या प्रयोगासाठी ते सिंधुदुर्गमधील ओरोसमध्ये दाखल झाले होते. यावेळी राहाण्यासाठी शासकीय विश्रामगृहाचा पर्याय त्यांनी निवडला होता. रात्री नियोजित प्रयोगासाठी ते बाहेर निघून गेले. प्रयोग संपल्यानंतर रात्री ते विश्रामगृहावर आल्यावर त्यांना सामान बाहेर फेकून देण्यात आलेलं दिसलं. यासंदर्भातील व्हिडीओ गिरीश ओक यांनी जारी केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या या दिग्गज कलाकाराचा घडलेल्या अपमानाबद्दल मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी सोशलमीडियावर जिल्ह्याच्या सीईओविषयीच जाहीर निषेध व्यक्त केला आहे. या निषेध संदर्भात सोशलमीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट श्रीनिवास नार्वेकर यांनी लिहीली आहे. या पोस्टला प्रेक्षकांचे लाडके कलाकार मोठया प्रमाणार शेअर करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये दिग्दर्शक रवी जाधव, मिलिंद कवडे, आरोह वेलणकर, मृण्मयी देशपांडे, सिध्दार्थ चांदेकर अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.                  ही पोस्ट पुढीलप्रमाणे, तुझे आहे तुजपाशी च्या कलाकारांना ऐन मध्यरात्री रस्त्यावर आणणा-या सिंधुदुर्गच्या सीईओंचा मी व्यक्तीश: जाहीर निषेध करतोय....! आत्ताच सर्फींग करत असताना एक उद्वेगजनक बातमी समोर आली आणि प्रचंड संताप आला. तुझे आहे तुजपाशी नाटकाच्या कोंकण दौ-यावर असलेले डॉ. गिरीश ओक, रवि पटवर्धन, या नाटकातील कलाकार आणि आगामी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर, विद्यमान अध्यक्ष गंगाराम गवाणकर आदींसह नाटकातल्या महिला कलाकारांचं सामान ऐन मध्यरात्री रेस्ट हाऊसबाहेर काढलं. सिंधुदुर्गच्या सीईओंनी आपल्या नातेवाईकांना रेस्ट हाऊसमध्ये जागा मिळवून देण्यासाठी हे कृत्य केल्याचं बोललं जातंय. हे अत्यंत लांच्छनास्पद आहे. नालायकपणाचा कळस आहे हा. डॉ. गिरीश ओक जिल्हाधिकार्यांशी फोनवर बोलतानाचा व्हिडीओदेखील आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी ज्या पध्दतीनं सरकारी भाषेत बोलताना ऐकू येतंय, तेसुध्दा खरोखर लाजिरवाणंच. शेखर सिंह यांनी आपल्या नातेवाईकांसाठी केलेला हा उद्दामपणा नक्कीच संतापजनक आहे. }}}}                      आता बोंबाबोंब झाल्यानंतर सारवासारव केली जाईल, माफी मागितली जाईल. पण काळ सोकावेल त्याचं काय? सीईओंवर याबाबत जोपर्यंत ठोस कारवाई होणार नाही, तोपर्यंत माफी आणि दिलगिरीला काही अर्थ नाही. आधीच आपल्याकडे सांस्कृतिक ठेवा जपण्याच्या बाबतीत आनंदीआनंद आहे. त्यात या अशा गोष्टी घडायला लागल्या तर मग आपण सांस्कृतिक राज्य म्हणवून घेण्याच्या लायकीचे नाही, हेच खरं. एरव्हीही आपल्या अनेक राज्यकर्त्यांच्या करंटेपणामुळे ही लायकी कमी कमी होत चाललीच आहे. त्यात आणखी ही भर नको. मी वैयक्तिकरित्या सीईओ शेखर सिंह यांचा तीव्र निषेध करतोय.