Join us  

प्रिया बापटला या फोटोमुळे सोशल मीडियावर करण्यात आले ट्रोल, तिने देखील दिले सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 3:42 PM

प्रिया बापटने घातलेल्या कपड्यांवरून काही नेटिझन्सने तिला खडे बोल सुनावले आहेत. पण तिने देखील त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच तिच्या फॅन्सने देखील कमेंटद्वारे तिला पाठिंबा दर्शवला आहे.

सेलिब्रेटींना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येणे काहीही नवीन नाही. नुकताच प्रिया बापटने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती आणि सई ताम्हणकर आपल्याला दिसत आहे. या फोटोत तिने घातलेल्या कपड्यांवरून काही नेटिझन्सने तिला खडे बोल सुनावले आहेत. पण तिने देखील त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच तिच्या फॅन्सने देखील कमेंटद्वारे तिला पाठिंबा दर्शवला आहे.

प्रिया ही एक मराठी अभिनेत्री असल्याने तिने कपडे घालताना भान ठेवायला पाहिजे असे काही नेटिझेन्सने तिला सुनावले आहे. पण तिच्या अनेक फॅन्सने तिची बाजू घेतली आहे. तिच्या एका फॅनने लिहिले आहे की, तिने काय घालायचं किंवा नाही हा तिचा प्रश्न, तुम्ही कोण तिला शिकवणारे? तुमच्याकडे मोबाईल आहे म्हणजे तुम्ही इतरांना समज देण्याच्या लायकीचे होता असा त्याचा अर्थ होत नाही तर एकाने म्हटले आहे की, ज्यावेळी हिंदी मधील अभिनेत्री असे कपडे घालते ते चालतं आणि आपल्या मातीतील मराठी मुलींना नाही चालत.... वाह.... विचार बदला कपडे नको.... 

तसेच तुम्ही ट्रेडिशनल आणि वेस्टर्न अशा दोन्ही मध्ये सुंदर दिसता ....कोणी काही म्हणू दे तू खूप सुंदर आहेस... असे एकाने कमेंट मध्ये लिहिले आहे.

प्रियाच्या कपड्यांवर तिला ट्रोल करण्यात आल्यानंतर तिने देखील कमेंटद्वारे या ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. तिने म्हटले आहे की, मला माहितेय प्रत्येकाला आपले एक स्वतंत्र मत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. पण कोणाच्याही पेहरावावरून ते कसे आहेत ते ठरवू नका. मला ज्यांनी पाठिंबा दिला त्यांची मी आभारी आहे. पण ज्यांना माझा पेहराव आवडला नाही त्यांच्या मताचा देखील मी आदर करते. प्रवृत्ती कपड्यांतून नाही तर वागणुकीतून दिसते. माझे कपडे ही माझी ओळख नव्हे.  इमेज आपल्या वागणुकीने आणि कामाने तयार होते... आपण काय कपडे घालतो याने होत नाही. पण तुम्हाला आवडलं नाही तरी हरकत नाही... त्यावरून माणसाची परीक्षा करणे मात्र चूक आहे. पण असो. या ट्रोलिंगने मला वाईट वाटत नाही. माझी सहनशक्ती वाढते. 

 

टॅग्स :प्रिया बापटसई ताम्हणकर