Join us  

प्रीतमला मिळाला तिचा ड्रीम रोल,'विजेता' सिनेमात अशी असणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 2:34 PM

शिक्षण कधी वाया जात नाही असं प्रीतमचं मत असून भूमिका निवडताना तिला या अभ्यासवृत्तीचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो असं ती सांगते. 

बॉलिवूडचे शोमॅन सुभाष घई यांच्या चित्रपटांची जादू आजही सिनेरसिकांना भुरळ पाडते. प्रेक्षकांना कथेमध्ये गुंतवून ठेवण्यात हातखंडा असणाऱ्या सुभाष घईंच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य म्हणजे दर्जेदार कथाविषय, नयनरम्य लोकेशन्स, सुमधुर संगीत आणि कुशाग्र कलाकार विशेष म्हणजे ब्युटी विथ ब्रेन अभिनेत्रींची चित्रपटांमध्ये वर्णी. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत* 'प्रीतम कागणे' या गुणी अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. प्रीतम कागणे मराठी चित्रपटसृष्टीचा नवा चेहेरा म्हणून आज नावारूपास येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'हलाल' चित्रपटातून पदार्पण करणारी ही अभिनेत्री पदार्पणापासूनच प्रेक्षकमनाची नाडी ओळखण्यात विजेती ठरत आली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  

'हलाल'  'संघर्षयात्रा' ' ३१ ऑकटोबर', नारीशक्तीचा जागर करणारा 'अहिल्या' असो वा 'मान्सून फुटबॉल' आणि 'वाजवूया बँड बाजा', 'तुझं माझं ऍरेंज मॅरेज' सारखा मसालापट प्रीतमने आपल्या अभिनयाच्या जोरावर या साऱ्या चित्रपटांतील व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर केवळ उत्तमरीत्या वठवल्याचं नाहीत तर प्रीतम त्या भूमिका स्वतः जगली. मुळात ऑडिओलॉजिस्ट व स्पीच पॅथलॉजिस्ट असणारी प्रीतम आभ्यासातल्या हुशारीसोबतच अभिनयाची असणारी आवड तिला मराठी मनोरंज क्षेत्रात घेऊन आली. शिक्षण कधी वाया जात नाही असं प्रीतमचं मत असून भूमिका निवडताना तिला या अभ्यासवृत्तीचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो असं ती सांगते. 

सुभाष घईंसोबत काम करण्याचा अनुभव विचारला असता प्रीतम म्हणते, ''It's like a dream come true. आपल्या कामाची दखल घेतली जात आहे हे पाहून माझा आनंद गगनात मावत नाहीये खरंतर..  'हलाल' आणि 'अहिल्या' मधील माझ्या कामाचं खूप कौतुक झालं आत्ता मी 'विजेता'साठी एका मॅरेथॉन ऍथलेटच्या भूमिकेसाठी तयारी करत आहे. दिग्दर्शकांसोबतच काही निवडक ऍथलेट्सकडूनही मी ट्रेनिंग घेत आहे. प्रत्येक कलाकाराचे स्वप्नं असते.. मोठ्ठ बॅनर... अभिनयाचा कस लावणारी कथा आणि एका पारखी दिग्दर्शकासोबत काम करण्याची सुवर्णसंधी... जी मला 'विजेता'द्वारा मिळाली आहे आणि मी नक्कीच या संधीचं सोनं करेन असा मला विश्वास आहे. रसिकांचं प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहतील अशी आशा करते."

टॅग्स :सुभाष घई