Join us  

आयुष्यातलं खरं वर्णन सांगणारा आगळावेगळा ‘प्रवास’!

By रवींद्र सखाराम मोरे | Published: February 07, 2020 3:13 PM

१४ फेब्रुवारी रोजी अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेंचा ‘प्रवास’ हा चित्रपट भेटीला येत आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या टीमने लोकमत कार्यालयास भेट दिली. त्यानिमित्त त्यांच्याशी मारलेल्या ह्या मनसोक्त गप्पा...

१४ फेब्रुवारी रोजी अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेंचा ‘प्रवास’ हा चित्रपट भेटीला येत आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या टीमने लोकमत कार्यालयास भेट दिली. त्यानिमित्त त्यांच्याशी मारलेल्या ह्या मनसोक्त गप्पा...

अशोक सराफ हे मराठीतले दिग्गज कलाकार आहेत. त्यांना चित्रपटाच्या ढिगभर स्क्रिप्ट येत असतात, मात्र ते निवडकच चित्रपटात काम करत असतात. त्यांच्या जेव्हा ‘प्रवास’ चित्रपटाची स्क्रिप्ट हाती आली तेव्हा हा चित्रपट का करावासा वाटला याबाबत विचारले असता ते म्हणाले की, जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा यात काही वेगळेपण आहे, म्हणून हा चित्रपट करावासा वाटला आणि चॅलेंजिंगचा विचार केला तर कोणताही रोल केला ते चॅलेंजच असतं. पण यात मला वेगळेपण वाटलं आणि वेगळं करण्यात मजा असते. मी आतापर्यंत कॉमेडी असो वा इतर चित्रपट केले आहेत, मात्र हा विषय थोडा वेगळा वाटला आणि आतापर्यंत मी असा रोल कधी केला नव्हता. म्हणून मला याचं आकर्षण वाटलं. त्यामुळे हा चित्रपट स्वीकारला.

अगोदर तुम्ही विनोदी चित्रपट करायचे, मात्र सध्या या टप्प्यावर तुम्ही वेगवेगळे विषय निवडतायत, मग आता तुम्हाला असेच विषय हाताळायचे आहेत का, असे अशोक सराफ यांना पुढे विचारले असता ते म्हणाले की, हो आता माझा तोच हेतू आहे. कारण आतापर्यंत मी कॉमेडी केली मात्र आता असं वाटतं की, थोडं वेगळं करावं. कारण आता कॉमेडी कोणी लिहत नाही. आणि विशेष म्हणजे माझ्या वयाची आता कॉमेडी कोणी लिहू शकत नाही आणि जी लिहत आहेत ती मी करु शकत नाही, असेही ते म्हणाले.

या टप्प्यावर भाषेचा विचार न करता हा मराठी चित्रपट तुम्हाला का करावासा वाटला असे पद्मिनी कोल्हापुरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, याची कथा मला खूप आवडली. एका सुंदर वयात आलेल्या एका जोडप्याची ही कथा आहे. अभिजातला लता कशी साथ देते, याचे वर्णन अर्थात या दोघांच्या आयुष्याचा प्रवास यात खूपच उत्कृष्टपणे दाखविण्यात आले आहे. सुरुवातीला मला मराठीसाठी वेळ देता आला नाही, त्यानंतर चिमणी पाखरं केला आणि आता मामांसोबतचा हा माझा पहिला सिनेमा आहे. खूपच चांगला अनुभव आला. हा कधी सुरु झाला आणि कधी संपला हे कधी कळलेच नाही.

तु जेव्हा स्क्रिप्ट लिहिली आणि पडद्यावर उतरवण्यासाठी या दोघांना पटवणं, ही गोष्ट तुला जास्त कठीण वाटली का? असे चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक उदापुरकर यांना विचारले असता ते म्हणाले की, हे दोघेही खूप सिलेक्टिव्ह आहेत. कारण दोघेही अभिनयात मुरलेले आहेत. हा वेगळा विषय असल्यानेच मी मामांकडे आणि पद्मिनी मॅमकडे गेलो. या सिनेमाचे नाव प्रवास आहे. हा प्रवास अभिजातच्या करिअरचा प्रवास आहे, त्याच्या फॅमिलीचा प्रवास आहे. हा प्रवास करत असताना जेव्हा अशा एका टप्प्यावर आपण थांबतो आणि विचार करतो की, एवढी धडपड आपण का केली? येथून हा प्रवास सुरु होतो. असे शशांक म्हणाला. माझ्याजवळ जेव्हा ही स्क्रिप्ट आली तेव्हा कोणताही कलाकार यात काम करण्यासाठी नाही म्हणणार नाही असा मला आत्मविश्वास होता आणि मी जेव्हा ही स्क्रिप्ट घेऊन मामांकडे आणि पद्मिनी मॅमकडे गेलो तेव्हा थोडी भीती होती, मात्र आत्मविश्वासही होता की, दोघांनी ही स्क्रिप्ट आवडेल, असेही शशांक म्हणाला.

पहिल्यांदाच तुम्ही पद्मिनी मॅमसोबत काम करत आहात, तर काय वाटले तुम्हाला, असे अशोक सराफ यांना विचारले असता ते म्हणाले की, आतापर्यंत त्यांनी खूप चांगले काम केले आहे, यात तिळमात्र शंका नाही, मात्र जेव्हा माझ्यासोबत पहिल्यांदाच काम करत असल्याचे म्हटलं म्हणजे मला साहजीकच वाटणार की, मी काम करत असताना त्यांचा कसा प्रतिसाद असेल. मात्र त्यांनी जे काम केले, त्यांनी जो प्रतिसाद दिला त्यामुळे माझी भूमिका थोडी उंचावली गेली असं मला वाटतं. मला माझा को-अ‍ॅक्टर एक बाहुली म्हणून नव्हे तर रिअ‍ॅक्ट होणारा हवा होता, ही भूमिका त्यांनी अतिशय चोखंदडपणे साकारली आहे.

एकंदरीत हा आगळा वेगळा ‘प्रवास’ आणि जो आपले लाडके मामा अर्थात अशोक सराफ आणि लाडकी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी अतिशय दमदारपणे साकारला आहे, तो सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन आवर्जून पाहावा असे आवाहन यावेळी सिनेमाच्या टीमने केली.