Join us  

प्रथमेश परब म्हणतो, थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर प्रेक्षक म्हणतील 'एक नंबर'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 2:24 PM

Prathamesh Parab: प्रथमेश परबचा आगामी 'एक नंबर' हा सिनेमा त्याच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.

प्रथमेश परब (Prathamesh Parab) म्हटलं की त्याचे बीपी, टकाटक, टाईमपास असे सिनेमे डोळ्यासमोर येतात, मात्र त्याचा आगामी 'एक नंबर' (Ek Number Movie) हा सिनेमा प्रथमेश परबच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. येत्या ११ मार्च ला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात एका सामाजिक विषयावर मनोरंजन पद्धतीने भाष्य करण्यात आलं आहे. महिला दिनाच्या निमित्ताने सोशल मिडियावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या एका टीझरमुळे याचा अंदाज येतो. यापुर्वी या सिनेमातील गाणी आणि टीजरमुळे प्रथम दर्शनी हा सिनेमा एडल्ट कॉमेडी किंवा डबल मीनिंग असेल, असे नक्कीच वाटले असेल, पण खरे पाहता विनोदी ढंगातून एक महत्वाचा संदेश या सिनेमा मार्फत देण्यात आला आहे.

अत्यंत गंभीर विषय गंभीर पद्धतीनेच मांडायला हवा, हा जो नियम आहे तो या सिनेमांत प्रकर्षाने टाळला आहे. 'टकाटक' नंतर दिग्दर्शक मिलिंद कवडे सोबत पुन्हा एकदा 'एक नंबर' च्या माध्यमातून प्रथमेश मोठ्या पडद्यावर झळकत असल्यामुळे, एकाच धाटणीचे सिनेमे प्रथमेश करत असल्याची टीका त्याच्यावर होत आहे. याबद्दल प्रथमेश सांगतो की, "'टाईमपास' पासूनच मला काही टीकाकारांना सामोरं जावं लागतंय, पण मला ट्रोलर्स ऐवजी तरूणांपर्यंत संदेश द्यायला आवडेल. मी माझे प्रमाणिक काम करत राहणार. कारण ट्रोलिंगनंतर लोकांचं भरभरून प्रेम देखील मिळतंय. मी एकाच धाटणीचे सिनेमे करतो, असे काही लोकं बोलतात, पण तसं नाहीय. माझे काही सिनेमे तसे असतील पण 'एक नंबर' सिनेमा एडल्ट कॉमेडी नक्कीच नाहीय. ह्यात काही डबल मीनिंग विनोद आहेत, पण हा मिस्ट्री कॉमेडी सिनेमा आहे, आणि हा यू ए सर्टिफाइड प्राप्त सिनेमा असून खूप महत्वाचा सामाजिक विषय यात मांडला असल्याचं प्रथमेशने सांगितले.

आपल्या या आगामी सिनेमाविषयी प्रथमेश भरभरून बोलतो. "सिनेमाचं जसं नाव आहे, अगदी सिनेमा देखील तसा एक नंबर झाला आहे. थिएटर मधून जेव्हा प्रेक्षक बाहेर पडतील तेव्हा त्यांच्या तोंडून ही 'एक नंबर' अशी पहिली दाद बाहेर पडेल" असा विश्वास प्रथमेश ने व्यक्त केला आहे. याव्यतिरिक्त प्रथमेशचे आणखीन काही सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. ज्यात ढिश्क्यांव, टकाटक २, लव सुलभ, होय महाराजा या सिनेमांचा समावेश आहे, यासोबतच 'दृश्यम २'च्या चित्रीकरणाला देखील लवकरच सुरूवात होत असल्याचे त्याने सांगितले.
टॅग्स :प्रथमेश परब