Join us  

प्रसाद ओक म्हणतोय, 'ओक ठोक' बोलायचे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 12:28 PM

प्रसाद ओकने त्याच्या आगामी नव्या एकपात्री कार्यक्रमाबद्दलची घोषणा सोशल मीडियावर केली आहे.

ठळक मुद्देप्रसाद ओकचा एकपात्री कार्यक्रम 'ओक ठोक' 'ओक ठोक'चा शुभारंभाचा प्रयोग 27 सप्टेंबरला

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रसाद ओकने नाटक, मालिका व चित्रपट या तिन्ही माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. तसेच त्याने 'कच्चा लिंबू' चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आणि या सिनेमाला बरेच पुरस्कार मिळाले आहेत. प्रसाद सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. तो आपल्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगत असतो. नुकतेच त्याने सोशल मीडियावर उद्या मी एक रोख ठोक अनाउंसमेंट करणार आहे. कोणी ओळखू शकेल का असे पोस्ट केले होते. या पोस्टनंतर तो उद्या काय सांगणार आहे, हे जाणून घेण्यासाठी सगळेच जण उत्सुक झाले होते. अखेर त्याने आज घोषणा केली. प्रसादने त्याच्या आगामी नव्या एकपात्री कार्यक्रमाबद्दलची घोषणा सोशल मीडियावर केली आहे.

प्रसाद ओकने सोशल मीडियावर स्वतःचा फोटो असलेला पोस्टर पोस्ट करून लिहिले की, 'एक नवाकोरा करकरीत एकपात्री कार्यक्रम 'ओक ठोक' हसत खेळत गुदगुल्या करत आपल्याला आपलाच आरसा दाखवणारा स्टॅण्ड अप विथ स्टॅण्डर्ड, आता रोख ठोक नाही 'ओक ठोक' बोलायचं...!!! शुभारंभाचा प्रयोग 27 सप्टेंबर. महाराष्ट्र मंडळ 'अबू धाबी'. या पोस्टनंतर प्रसाद ओकवर या कार्यक्रमासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.'

प्रसाद ओक 'ओक ठोक' या एकपात्री कार्यक्रमातून अनोख्या अंदाजात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओक ठोक हा स्टॅण्ड अप कॉमेडी शो असून  27 सप्टेंबरला या एकपात्री नाटकाचा शुभारंभ अबुधाबीमध्ये पार पडणार आहे. 

टॅग्स :प्रसाद ओक