Join us  

पार्थ भालेरावच्या अव्यक्त शॉर्टफिल्मची झाली कान फेस्टिव्हलमध्ये निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2017 6:35 AM

पार्थ भालेरावने किल्ला, खालती डोकं वरती पाय यांसारख्या मराठी चित्रपटात काम केले आहे. मराठी चित्रपटातील त्याच्या सगळ्याच भूमिका प्रचंड ...

पार्थ भालेरावने किल्ला, खालती डोकं वरती पाय यांसारख्या मराठी चित्रपटात काम केले आहे. मराठी चित्रपटातील त्याच्या सगळ्याच भूमिका प्रचंड गाजल्या आहेत. तसेच तो अमिताभ बच्चन यांच्यासोबत भूतनाथ रिटर्न्स या हिंदी चित्रपटात झळकला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याला किल्ला आणि भूतनाथ रिटर्न्स या दोन्ही चित्रपटांमधील भूमिकांसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तो नुकताच लालबागची राणी या चित्रपटात झळकला होता. त्याने चित्रपटात काम करण्यासोबतच काही लघुपटांमध्येदेखील काम केले आहे आणि आता तर त्याच्या लघुपटाची थेट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाली आहे. कान्स फेस्टिव्हलमध्ये लघुपटाची निवड झाल्याने पार्थ सध्या खूपच खूश आहे. पार्थ भालेरावची प्रमुख भूमिका असलेल्या अव्यक्त या शॉर्टफिल्मची कान फेस्टिव्हलच्या कोर्ट मेट्रेज शॉर्ट फिल्म कॉर्नर या विभागात निवड झाली असून या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन ओंकार मोदगीने केले आहे. दिग्दर्शन करण्याची ओंकारची ही पहिलीच वेळ आहे. या शॉर्टफिल्ममध्ये पार्थसोबत अनिरुद्ध खुटवड यांची प्रमुख भूमिका आहे. एका किराणावाल्याच्या दुकानात या शॉर्टफिल्मची अधिकाधिक कथा घडत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या शॉर्टफिल्ममध्ये वडील-मुलाच्या नात्यावर भाष्य करण्यात आले आहे. या शॉर्टफिल्मचा दिग्दर्शक ओंकारने मुंबईच्या नाट्यस्पर्धांमधून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने सुरुवातीला नाटकामध्ये काम केले आहे. त्यानंतर तो दिग्दर्शनाकडे वळला. त्याने उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर या दिग्दर्शकांबरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. पुण्यातील काही ठिकाणी या शॉर्टफिल्मसचे चित्रीकरण करण्यात आले आहे.