Join us  

६० दशलक्षहून अधिक जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहचली ही मराठी वेब सिरीज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 6:00 PM

या वेबसिरिज मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनिकेत विश्वासराव, तेजश्री प्रधान, सक्षम कुलकर्णी आणि किशोरी अंबिये यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

आज सगळ्यांकडेच स्मार्ट फोन आणि मनसोक्त इंटरनेट असल्याकारणाने डिजिटल मनोरंजन विश्वाला वेगळीच झळाळी आली आहे. हवं तेव्हा, हवं ते पाहता येतं ही मुभा असल्याने तरुण वर्गाची डिजिटल मनोरंजनाला अधिक पसंती मिळते आहे. 'पॅडेड पुशप' ही मराठी वेब-सिरीज रिलीजच्या काही काळातच या वेब-सिरीजने डिजिटल विश्वात धुमाकूळ घातला आहे. 

 या वेबसिरिज मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनिकेत विश्वासराव, तेजश्री प्रधान, सक्षम कुलकर्णी आणि किशोरी अंबिये यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रासंगिक विनोदाच्या चौफेर फटकेबाजीमुळे ही वेब-सिरीज प्रदर्शनातच प्रेक्षकांच्या पसंतीस  पात्र ठरते आहे. या सिरीजचा कंटेंट इतका प्रभावी आहे की, त्याला भाषेची मर्यादा नाही, म्हणूनच मराठी सोबत इतर भाषिक प्रेक्षक देखील ही सिरीज बघत आहेत.आकाश गुरसाळे यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले  आहे. पॅडेड कि पुशप १९० हून अधिक देशातील ६० दशलक्षहून अधिक जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहचली आहे. सर्व प्रकारच्या डिजीटल माध्यमाद्वारे प्रेक्षकांमध्ये पोहोचलेली ही एकमेव मराठी वेब सिरीज आहे. मराठी कुटुंबात, किंवा घरात ज्या गोष्टींवर बोलले जात नाही, किंवा जो विषय टाळला जातो तोच विषय यात हाताळला असल्याने देखील सिरीज बघण्याची उत्सुकता अधिक वाटत असते. 

ह्या वेब सिरीजची कथा नवीन लग्न झालेल्या आदीत्य (अनिकेत विश्वासराव)च्या जीवनाभोवती फिरते. अंर्तवस्र विकण्याचे काम करत असलेला आदित्य आपल्या कामाचे स्वरुप स्वत:ची पत्नी आणि खोचक सासू पासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. यात कशी विनोदनिर्मिती होते ते बघण्यासारखे आहे. अशी भन्नाट आणि आगळावेगळा विषय असणारी वेबसिरिज प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच पाहावी अशीच आहे.