Join us  

पारधी समाजातील वास्तव समाजासमोर मांडणारा 'पारधाड' सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 5:42 PM

ज्ञानेश्वर कुंडलिक भोसले दिग्दर्शित 'पारधाड' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ज्ञानविजय फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित ज्ञानेश्वर कुंडलिक भोसले दिग्दर्शित 'पारधाड' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पारधी समाजातीळ लोकांच्या लक्षणीय उपस्थितीत 'पारधाड' या सिनेमाचा नुकताच पोस्टर ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला. फासे पारधी समाजाचे वास्तव आणि  दाहकता या सिनेमात चित्रित करण्यात आली आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या मूलभूत गरजांपाससून भटक्या आणि विमुक्त जाती कशा प्रकारे वंचित आहेत याचे चित्रण सिनेमात करण्यात आले आहे. 

दिग्दर्शक ज्ञानेश्वर भोसले यांनी पारधाड सिनेमाची कथा, निर्मिती आणि दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. याप्रसंगी मा. मेघराजराजे भोसले (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ), गिरीश प्रभुणे (सामाजिक कार्यकर्ता), भिकूजी तथा दादा इदाते (पारधी आयोग भारत सरकार), विजया भोसले व्यवस्थापिका (भारत माता आदिवासी पारधी विध्यार्थी वसतिगृह मोहोळ-सोलापूर), मीरा ताई फडणीस (स्वामी विवेकांनद आदिवासी छात्रवास यवतमाळ) आणि  राजश्री काळे नगरसेविका (पुणे महानगरपालिका) तसेच सिनेमातील कलाकार मंडळी उपस्थितीत होते. या सिनेमाबाबत दिग्दर्शक ज्ञानेश्वर म्हणाले, 'गुन्हेगार' ही ओळख वगळता या समाजातील लोकांना कोणत्याही प्रकारचे ओळख प्रमाणपत्र नाही. समाजाकडून, पोलिसांकडून अवहेलना आणि अत्याचार पाचवीला पुजलेला जो माझ्या कादंबरीत मावणार नाही. त्याची झळ आणि सत्यता सिनेमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशातून पारधाड सिनेमाची निर्मिती केली. या सगळ्यात माझी पत्नी आणि बहिणीने केलेला त्याग आणि बलिदान शब्दात मांडू शकत नाही जो सिनेमात पाहिल्यावरच लक्षात येईल. या सिनेमाची पटकथा, संवाद जहिरुद्दीन पठाण यांचे असून छायांकन ए. रेहमान शेख, तांत्रिक दिग्दर्शक अमर पारखे, कार्यकारी निर्माता मयूर रोहम, कला दिग्दर्शन सुहास पांचाळ, निर्मिती नियंत्रक अनुप काळे, संगीत-पार्श्वसंगीत प्रजापती भिसे, गीतकार सिकंदर मुजावर, गायक नंदेश उमप, साजन बेंद्रे, अंजली प्रजापती यांनी सिनेमातील गाणी गायली आहे.  अभिनेता धनंजय मांद्रेकर, संदेश जाधव, चेतना भट, कीर्ती चौधरी, मनोज टाकणे, दीपक चव्हाण, शीतल कलापुरे, सोनल आजगावकर, निशा काळे आणि प्रदीप कोथमिरे ही कलाकार मंडळी सिनेमात दिसणार आहे. येत्या एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणारा पारधाड सिनेमा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहचून प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालेल अशी आशा आहे.