ओम राऊत करणार अजय देवगणच्या 'या' सिनेमाचे दिग्दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 16:05 IST
ऐतिहासिक घटना,थोर ऐतिहासिक व्यक्तीमत्त्व यांच्यावर सिनेमा बनणं हे काही नवीन राहिलेलं नाही.छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवणारे सिनेमा रुपेरी पडद्यावर ...
ओम राऊत करणार अजय देवगणच्या 'या' सिनेमाचे दिग्दर्शन
ऐतिहासिक घटना,थोर ऐतिहासिक व्यक्तीमत्त्व यांच्यावर सिनेमा बनणं हे काही नवीन राहिलेलं नाही.छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवणारे सिनेमा रुपेरी पडद्यावर आलेत.याशिवाय 'बाजीराव मस्तानी', 'मुघल-ए-आझम','जोधा अकबर','झाँशी की रानी' असे एक ना अनेक सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. त्यातल्या त्यात मराठ्यांच्या इतिहासानं चित्रपटसृष्टीला कायमच भुरळ घातली आहे. त्यामुळेच की काय आता मराठ्यांच्या इतिहासातील एक वीर योद्धा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान मावळे अशी ओळख असणा-या तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आता सिनेमा बनत आहेत.लवकरच हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. तानाजी - द अनसंग वॉरियर असं या बायोपिक सिनेमाचं नाव असेल. या सिनेमात अभिनेता अजय देवगण हा तानाजी मालुसरे यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. लोकमान्य - एक युगपुरुष या सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. कोंढाणा किल्ला सर करण्याची जबाबदारी शिवरायांनी तानाजी मालुसरे यांना दिली होती. त्याचवेळी तानाजी मालुसरे यांच्या मुलाचं लग्न होतं. त्यावेळी आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे अशी घोषणा तानाजी मालुसरे यांनी मोहिमेला जाण्याआधी दिली होती. गडावर किल्लेदार उदयभान राठोड नावाचा शूर व्यक्ती होती. त्याच्या हाताखाली दीड हजार सैनिकांची फौज होती. तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. कोंढाण्यावर जाण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी कठीण मार्ग निवडला. रात्रीच्या वेळी तानाजी मालुसरे घोरपडीच्या साहाय्याने किल्ल्यावर गेले. उदयभानाच्या सैन्याशी त्यांनी निकराने लढा दिला. ढाल तुटली तरी शेला बांधून ते अखेरच्या श्वासापर्यंत लढले. उदयभानाला निपचित पाडून तानाजी मालुसरे धारातिर्थी पडले. मराठ्यांनी हा किल्ला काबीज केला. तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची ही बातमी शिवरायांना समजली त्यावेळी गड आला पण सिंह गेला अशा शब्दांत तानाजी मालुसरे यांच्या शौर्याचं वर्णन केलं.तानाजी मालुसरे यांची हीच शौर्यगाथा आता 'तानाजी - द अनसंग वॉरियर' या सिनेमातून पाहायला मिळणार आहे.