Join us  

Mhorkya Movie : मराठी सिनेमाची उपेक्षा सुरुच, मल्टिप्लेक्समध्ये ‘म्होरक्या’ला जागा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 10:10 AM

Mhorkya Movie : दिग्दर्शक अमर देवकर यांच्यासह ग्रामीण भागातील कलाकारांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या चित्रपटात रमण देवकर, अमर देवकर, रामचंद्र धुमाळ, सुरेखा गव्हाणे, अनिल कांबळे, ऐश्वर्या कांबळे, यशराज कऱ्हाडे यांच्या भूमिका आहेत.

मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांकडून मराठी सिनेमाची गळचेपी होण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. आज प्रदर्शित झालेला   दोन-दोन राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवणारा बहुचर्चित 'म्होरक्या'  सिनेमाला थिएटरच मिळाले नसल्याचं चित्र मुंबईतल्या जवळपास सगळ्याच मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनमध्ये पाहायला मिळालं. 

 

रिलीजनंतरही मराठी रसिकांना म्होरक्याचं दर्शन झालेलं नाही. सिनेमा पाहायाचाय पण तो कुठे जाऊन बघता येईल हाच प्रश्न रसिकांनाही पडला आहे. सिनेमाला मुंबईत मल्टिप्लेक्सवाल्यांनी एकही स्क्रीन उपलब्ध करून दिलेला नाही. फक्त मोजक्या सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्ये केवळ एक खेळ मिळाल्याने निर्मात्यांपुढे मोठाच पेच पडला आहे.

 

ग्रामीण भागातील वास्तव गोष्टीवर हा सिनेमा भाष्य करतो. दिग्दर्शक अमर देवकर यांच्यासह ग्रामीण भागातील कलाकारांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या चित्रपटात  रमण देवकर, अमर देवकर, रामचंद्र धुमाळ, सुरेखा गव्हाणे, अनिल कांबळे, ऐश्वर्या कांबळे, यशराज कऱ्हाडे यांच्या भूमिका आहेत.

मराठी सिनेमात आशयघन सिनेमांची निर्मिती होतेय. दर्जेदार सिनेमा रसिकांच्या भेटीला येतायत.. मात्र मुंबईत मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटर मालकांकडून होणा-या गळचेपीमुळं सिनेमा रसिकांपर्यंत पोहचत नाही... याहून मोठं दुर्देव ते कोणतं. त्यामुळे मराठी सिनेमाची ही गळचेपी कधी थांबणार असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. 

टॅग्स :म्होरक्या