Join us  

निवेदिता सराफ यांनी सादर केली मनाला भिडणारी कविता, तुमचेही डोळे पाणावतील…

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 3:31 PM

वाचा निवेदिता यांनी सादर केलेली संपूर्ण कविता…

मराठी कलाविश्वातील गाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ.  ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबरच निवेदिता सराफ यांनी कलाक्षेत्राला मोठं योगदान दिलं आहे. निवेदिता सराफ यांनी गेली अनेक वर्ष विविध नाटकं, मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  नुकतेच रोहिणी निनावे यांच्या ‘सातवा ऋतू’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमात निवेदिता सराफ यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी रोहिनींची एक कविता सादर केली. 

'आयुष्य तसं ठीक चाललंय' असं या कवितेचे नाव आहे. वाचा निवेदिता यांनी सादर केलेली संपूर्ण कविता…

आजकाल सकाळी उठल्यावर मला पाहिल्यावर आरसा हसत नाही,नुसतं हसल्याने काय आनंद मिळत नाही, हे आता आरशालाही कळलं आहे,

बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय…

म्हटलं तर हमसून रडावं असं काही नाही,हिरीरीने आयुष्याला भिडावं असं काही नाही,आयुष्यात काहीच मिळवलं नाही असंही नाही,पण आता सुक्याबरोबर ओलंही जळलंय,  

बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय…

तशी त्याला आवडते वगैरे म्हणे मी,करतो सोशल मीडियावर माझे स्तुती बिती,होतात आमच्या वर्षातनं चार भेटी,असंही नाही की मी रोज भेटत नाही म्हणून त्याचं काही बिघडलंय,

बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय…

मी कधी कुणाच्या मागे लागत नाही,कुणी माझ्या मागे लागलेलं मला आवडतही नाही,पण त्याच्या मागे मी आणि माझ्या मागे त्याने फिरत रहावं,असं माझं आणि सुखाचं बहुदा ठरलंय,

बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय…

तसे ओळखतात चार लोक मला,अगदीच काही केलं नाही आयुष्यात असं नाही,पण कुणी मागे धावत येईल,माझ्यावर जीव ओवाळून टाकावं, तसंही नाही,त्या चांदण्या, तो बहर, मोरपीस वगैरे,जुन्या पुस्तकाच्या पिवळ्या पानात उरलंय,मधाच्या फांदीवर एक स्वप्न उगवलं होतं,ते तुझ्या वाटेवर पुरलंय,  

बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय…

काही दु:ख सांगता येत नाहीत, मनातही ठेवता येत नाहीत,एखाद्या लव्हाळीसारखं रुतंत राहतं,अश्वत्थामाच्या जखमेसारखं आयुष्यभर कपाळावर सलत राहतं,कुणीतरी माझ्या आनंदाचं पान माझ्याही नकळत बदललंय

बाकी तसं आयुष्य आता ठीक चाललंय… 

निवेदिता सराफ यांनी मराठी सिनेसृष्टी तर गाजवलीच आहे. परंतु, काही हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यांनी 1984 साली 'ये जो है जिंदगी','केसरी नंदन','सपनो से भरे नैना' या हिंदी मालिकांमध्ये काम केलं होतं. तर 'किंग अंकल', 'सर आँखो पर', 'जायदाद' या हिंदी सिनेमातही त्या झळकल्या आहेत. 

टॅग्स :निवेदिता सराफसेलिब्रिटीमराठी अभिनेता