Join us  

बर्फी वाटा हो... गायिका सावनी रविंद्रच्या घरी कन्यारत्न, कुटुंबीयांना अत्यानंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 3:48 PM

सावनी रवींद्र आणि डॉ. आशिष धांडे यांच्या जीवनात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. दोघांच्या जीवनात एक बाळ आलं आहे. सावनीने मुलीला जन्म दिला आहे.

गायिका ‘सावनी रवींद्र’च्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सावनी आणि डॉ. आशिष धांडे यांच्या जीवनात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. दोघांच्या जीवनात एक बाळ आलं आहे. सावनीने मुलीला जन्म दिला आहे. मे महिन्यात पहिल्यांदा सावनीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत गरोदर असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती.

त्यानंतर तिने डोहळाजेवणाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या या फोटोंवर रसिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. प्रेग्नंसीदरम्यानही ती खूप एक्टीव्ह होती. फोटो शेअर करत बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहात असल्याचे तिने सांगितले होते. अखेर तो दिवस उजाडला आणि सावनीनी मुलीला जन्म दिला. 

सावनीने मध्यंतरी तिच्या प्रेग्नंसीदरम्यानच एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त करताना सांगितले होते,की ‘’माझ्या मनात सध्या खूप अलौकीक भावना आहेत. ज्या मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आजवर मी गायिका म्हणून आईपणावर वेगवेगळ्या धाटणीची गाणी गायली आहेत.

अंगाईगीत, डोहाळ जेवणाचे गीत, बारश्याची गाणी मी या आधी गायली होती. पण आता मी स्वत: त्या भूमिकेत जाणारं आहे. त्यामुळे आईपण अनुभवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला अस वाटतं की प्रत्येक स्त्री ही भाग्यवान असते. कारण ती आई होऊ शकते. आईपण काय असतं हे फक्त एक आईच जाणू शकते. आणि सध्या मी मातृत्वाच्या उंबरठ्यावर आहे. आणि या फेजचा मी पुरेपुरं आनंद घेत  असल्याचे सांगितले होते.’’

पुढे ती सांगते, ‘’माझं बाळ माझ्यासाठी लकी चार्म आहे. कारण माझं बाळ पोटात असताना मला माझ्या आयुष्यातील इतका मोठा प्रतिष्ठीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच गेल्या सहा महिन्यात मी गरोदरपणात अनेक वेगवेगळे म्युझीक अल्बम, नविन गाणी, काही प्रोजेक्टस शूट केलेत. त्यातील बरीचशी गाणी रिलीज झाली. काही गाणी लवकरच रिलीज होतील. मला खूप अभिमान आहे की माझ्या होणा-या बाळाने मला त्या परिस्थितीत अजिबात त्रास दिलेला नाही. आता मी माझ्या बाळाच्या स्वागतासाठी फारचं उत्सुक असल्याचे तिने सांगितले होते.