Join us

​ ​ नागराज मंजुळे यांना ‘ट्रेंडसेटर्स’चा लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2017 20:10 IST

संपूर्ण देशाला  ‘सैराट’ करणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना एन्टरन्टेन्मेंट क्षेत्रातील ट्रेंडसेटर्सचा लोकमत महाराष्ट्रीय आॅफ इयर पुरस्कार दिला गेला. राजेश ...

संपूर्ण देशाला  ‘सैराट’ करणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना एन्टरन्टेन्मेंट क्षेत्रातील ट्रेंडसेटर्सचा लोकमत महाराष्ट्रीय आॅफ इयर पुरस्कार दिला गेला. राजेश महापुस्कर, योगेश लखानी आणि उज्ज्वल निकम यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. माझ्या पहिल्या कवितेला लोकमतनेच पुरस्कार देऊन गौरविले होते. लोकमतने नेहमीच प्रतिभावंतांचे कौतुक केले आहे. या पुरस्कारासाठी मी लोकमतचा आभारी आहे, अशा शब्दांत नागराज यांनी लोकमतचे आभार मानले.नागराज मंजुळे हे सध्याच्या घडीला सिनेमा क्षेत्रातील एक चर्चित नाव. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील जेऊर गावच्या नागराज मंजुळे या नावाभोवती सध्या एक नवं वलय प्राप्त झालंय. गावातल्या जत्रेतील टॉकिजमधले सिनेमा पाहून त्याच्या मनात सिनेमाविषयी ओढ निर्माण झाली. शाळा बुडवून त्याने अनेक सिनेमा पाहिले. पुढे शिक्षण घेता घेता त्याची अनेक दिग्गजांशी ओळख झाली. त्यातूनच नागराज मंजुळेच्या डोक्यात नवे विचार संचार करु लागले. खरं तर इथूनच ब्रँड नागराज मंजुळेचा खरा प्रवास सुरु झाला. मराठीत वेगळ्या प्रवाहाचा सिनेमा आणण्याचं धाडस त्याने केले. आपल्या पहिल्याच ‘फँड्री’ या सिनेमातून त्याने हे धाडस रुपेरी पडद्यावर सिद्ध करुन दाखवलं. सिनेमाची कथा, त्यातील कलाकार, त्यांचं जगणं-वागणं सारं काही तळागाळातल्या माणसाचं. हे वास्तववादी चित्र त्यानं चंदेरी पडद्यावर साकारलं. ‘फँड्री’मुळे नागराज मंजुळेमधील दिग्दर्शकाला एक नवी ओळख मिळाली. ‘फँड्री’च्या पुढे जात त्यानं आपल्या गावातल्या मातीतल्या कलाकारांना घेऊन एक ‘सैराट’ कलाकृती साकारली. या कलाकृतीने असं काही वेड लावलं की रसिकांसह अवघी चित्रपटसृष्टीच झिंग झिंग झिंगाट झाली. सिनेमाची कथा, त्यातील कलाकारांची निवड, संवेदनशील दिग्दर्शक नागराजमधील विविध पैलू, सिनेमाचं संगीत यामुळे ‘सैराट’ने कोटींच्या कोटी उड्डाणे केली. विविध पुरस्कारांची बरसात ‘सैराट’वर झाली. नागराजचा आजच्या घडीला एक वेगळा फॉलोअर आहे. त्याची फॅन फॉलोइंग केवळ महाराष्ट्रातच नाही तर सा-या भारतात आहे. सिनेमासोबतच त्याची पिस्तुल्या ही शॉर्टफिल्मसुद्धा रसिकांवर जादू करुन गेली आहे. सध्या लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशा दिग्दर्शकांच्या यादीत नागराज मंजुळेचं नाव घेतलं जातं. तरुणाईनं आदर्श घेण्यासारख्या ब-याच गोष्टी नागराज मंजुळे यांच्यात आहेत. त्यामुळेच एन्टरन्टेन्मेंट क्षेत्रातील ट्रेंडसेटर्सचा लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर हा पुरस्कार नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला.