Join us  

बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा', 'जुनं फर्निचर' आणि 'स्वरगंधर्व...'चा बोलबाला

By संजय घावरे | Published: May 07, 2024 8:09 PM

हिंदीला मागे टाकत मराठी चित्रपट आघाडीवर

मुंबई - मागील काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर एकही मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. इंडियन प्रीमियर लीग आणि लोकसभा निवडणूकीच्या वातावरणात कोणत्याही निर्मात्याने मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित करण्याची रिस्क घेतली नाही. हिंदी सिनेमांचे हे पाऊल मराठी चित्रपटांच्या पथ्यावर पडणारे ठरले आहे.

'जुनं फर्निचर', 'नाच गं घुमा' आणि 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटांचा सध्या मराठी तिकिटबारीवर बोलबाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपटांनी कधीच आयपीएलचे भय बाळगले नसून, मराठी रसिकांनी कडक उन्हाचा तडाखा सहन करूनही नेहमीच चांगल्या कलाकृतींना दाद दिली आहे. हेच चित्र या उन्हाळ्यातही पाहायला मिळत असल्याचे चित्रपट व्यवसाय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महेश मांजरेकरांच्या बऱ्याच नवीन चित्रपटांनी आयपीएलच्या काळातही चांगली कमाई केली आहे.

अगदी आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात रिलीज झालेल्या मांजरेकरांच्या 'दे धक्का'ने २००८मध्ये इतिहास रचला होता. यंदा आयपीएलमध्ये आलेला त्यांचा 'जुनं फर्निचर'ही गर्दी खेचत आहे. पहिल्या आठवड्यात ४ कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने आतापर्यंत ६.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दरवर्षी आयपीएलच्या काळात कोणताही मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित केला जात नाही. त्यामुळे वर्षभर प्राईम टाईम शोसाठी संघर्ष करणाऱ्या मराठी चित्रपटांसाठी आयपीएल दरम्यान चांगले शोज मिळतात.

या काळात प्रदर्शित झालेल्या चांगल्या मराठी चित्रपटांनी भरघोस कमाई केल्याचा इतिहास आहे. यंदा तीन मराठी चित्रपटांना याचा फायदा उठवण्यात यश आले आहे. येत्या शुक्रवारी राजकुमार रावचा बहुचर्चित 'श्रीकांत' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कदाचित याचा थोडाफार फटका सध्या गर्दी खेचणाऱ्या तीनही मराठी चित्रपटांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१ मेच्या मुहूर्तावर 'नाच गं घुमा' आणि 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हे दोन महत्त्वाचे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. भिन्न विषयांवर आधारलेले दोन्ही चित्रपट रसिकांमध्ये उत्सुकता वाढवत गर्दी खेचण्यात यशस्वी होत आहेत. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांची प्रमुख भूमिका असलेल्या स्वप्नील जोशी निर्मित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा'ने ८.५० कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.

थोर संगीतकार सुधीर फडकेंच्या जीवन प्रवासावर आधारलेल्या 'स्वरगंधर्व सुधीर फडके'मध्ये सुनील बर्वे आणि मृण्मयी देशपांडे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने पहिल्या आठवडयात २.५ कोटी रुपयांचा बिझनेस आपल्या नावे केला आहे. महाराष्ट्रातील कडक उन्हाळ्याचा फटका या चित्रपटांनाही बसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :मराठी चित्रपटबॉलिवूड