गायिका अनुराधा पौडवाल यांनी उलगडले हे रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 17:30 IST
सिनेमा संगीत असो किंवा मग भक्तीगीत. आपल्या सूरांच्या जादूने रसिकांवर मोहिनी घालणा-या प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांना नुकतंच देशातील ...
गायिका अनुराधा पौडवाल यांनी उलगडले हे रहस्य
सिनेमा संगीत असो किंवा मग भक्तीगीत. आपल्या सूरांच्या जादूने रसिकांवर मोहिनी घालणा-या प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांना नुकतंच देशातील सर्वोच्च मानाचा समजला जाणारा पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झाला. याचनिमित्ताने अनुराधा पौडवाल यांच्याशी सीएनएक्स लोकमतने खास संवाद साधला. यावेळी नव्वदीमधील संगीत, नव्या गायक कलाकार यांना मिळणा-या संधी, भविष्यातील योजनांबद्दल अनुराधा पौडवाल यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आधी डी. लिट पदवी, त्यानंतर शरद पवार पुरस्काराने सन्मान आणि लगेचच दुस-या दिवशी सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर... वर्षाची ड्रीम सुरुवात आपल्यासाठी ... पद्मश्री जाहीर झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया काय होती? मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. कारण 2017 या नव्या वर्षाची सुरुवात माझ्यासाठी याहून चांगली होऊच शकत नाही. आधी डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून डी.लिट ही पदवी, त्यानंतर शरद पवार पुरस्काराने माझा गौरव करण्यात आला. त्यानंतर लगेचच दुस-या दिवशी माध्यमांमधील माझ्या हितचिंतकांकडून मला फोन येऊ लागले की मला पद्मश्री जाहीर झाला आहे. मला हे अपेक्षितच नव्हतं. माझ्यासाठी सुखद धक्का होता. आजवर आपापल्या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला पद्मश्री पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी माझी निवड होणे हा माझा खूप मोठा सन्मान आहे असं मला वाटते. भक्तीगीतं, भावगीतं, सिनेमा, विविध भाषांमधील गाणी ते आज पद्मश्री मिळेपर्यंतचा प्रवास याचं एका वाक्यात वर्णन करायचं असेल तर कसं कराल? आजवर जीवनात विविध टप्पे आले. अनेक चढउतार आले. प्रत्येक टप्प्यातून काही ना काही शिकायला मिळाले. प्रत्येक अनुभव हा नवा होता. त्यामुळे एका वाक्यात खरं तर सगळं व्यक्त करणे कठीण जाईल. 90चं दशक अनुराधा पौडवाल यांच्यासाठी ओळखलं जातं. आजही टीव्ही, शो आणि रेडिओ चार्टबस्टर्समध्ये तीच गाणी सुपरहिट आहेत.. कसं वाटतं ते पाहून? त्यावेळी गाण्याची मजा काही औरच होती. कारण त्यावेळची माध्यमंसुद्धा त्या काळाला अनुसरुन होती. गाणी रेडिओवर वाजायची. रसिकांकडून या गाण्यांना पसंती मिळायची. कारण रेडिओवर गायकाचा चेहरा दिसायचा नाही. त्यामुळे गाणी फक्त आणि फक्त मेरीटवरच चालायची. रसिकांकडून चांगल्या आणि दर्जेदार संगीताला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा. आज काळ बदलला आहे. माध्यमं बरीच झाली आहेत. तरीसुद्धा गाणी एफएमच्या माध्यमातून रेडिओवर ऐकली जातात. एफएमवरसुद्धा रसिकांकडून खास नव्वदच्या दशकातील गाण्यांची मागणी जास्त असते. तसे कार्यक्रम खास सादर केले जातात. त्यामुळे ही सगळी नव्वदच्या दशकातील गाण्यांची आणि संगीताची जादू होती. सध्याची गाणी, गायक आणि खासकरुन जे सिंगिंग रियालिटी शो आहेत त्याबद्दल अनुराधा पौडवाल कसं पाहतात? सध्या रियालिटी शोचा जमाना आहे असं म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण सगळीकडे जणू काही रियालिटी शोचा सुळसुळाट झाला आहे. मात्र यामुळे एक गोष्ट चांगली झाली आहे. ती म्हणजे रियालिटी शोच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना उत्तम व्यासपीठ निर्माण झालं आहे. नाही तर पूर्वीच्या काळी काय होतं की एक संधी मिळवण्यासाठी अथक मेहनत करावी लागायची. आज रियालिटी शोमुळे कुणीही म्हणू शकणार नाही की व्यासपीठ मिळालं नाही. रियालिटी शोच्या माध्यमातून दर दिवसाला जवळपास दोनशे गायक समोर येतायत. ओ.पी.नय्यर यांनी आपल्याला नेक्स्ट लता असे म्हटलं होतं... त्यावेळी ती बाब आपल्यासाठी किती खास होती? आपलं काम, त्याचा दर्जा रसिक मायबाप ठरवत असतो. प्रत्येकाचं आपापलं एक वैयक्तिक मत असते. त्यामुळे ओ.पी. नय्यर यांनी दिलेल्या कमेंटकडे एक चांगली कॉम्प्लिमेंट म्हणून बघते. मागे वळून पाहताना कोणत्या गोष्टी हृदयाच्या कोप-यात कायम स्वरुपी ठेवाव्या अशा वाटतील? आज मी जे काही आहे, जे काही मला यश मिळत आहे हे सगळे मोठ्यांचे आशीर्वाद, खासकरुन माझा मुलगा आणि सासरच्या मंडळींमुळे शक्य झाले आहे. रसिकांनी भरभरुन दिलेले प्रेमही कसं विसरता येईल. यानंतर अनुराधा पौडवाल सिनेमात गाणे कधी गाणार असे रसिकांचा प्रश्न आहे. की भक्तीगीत आणि शोमधून आपल्या सूरांची जादू रसिकांना अनुभवता येणार आहे? मला गाण्यासाठी काहीच अडचण नाही. मात्र योग्य वेळ आल्याशिवाय काहीच होत नसते आणि योग्य तसंच चांगली निवड करणे यावर माझा ठाम विश्वास आहे. मी ज्या पद्धतीने गाते, मला गायकीला अनुसरुन काही गाणी आली तर मला नक्की गायला आवडेल. फार कमी जणांना माहित आहे की दुष्काळग्रस्तांसाठी आपण आणि आपल्या सूर्यादय संस्थेने फार भरीव काम केले आहे.. तर याप्रमाणेच जवानांसाठी आपल्याला काही तरी करायचंय.. त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल? दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम केले. तसंच काही तरी काम करावं अशी खूप इच्छा आहे. इतर देशात लष्कराला वेगळं स्थान आहे. आपल्याकडे भारतमातेच्या रक्षणासाठी आणि सारे देशवासीय सुखाने झोपावेत यासाठी जवान दिवसरात्र डोळ्यात तेल घालून आपल्या सीमांचं शत्रूंपासून रक्षण करतात. आपल्या प्राणाची पर्वा न करता देशासाठी शहीद होतात. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी काही तरी करावं असं वाटत होते. या जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विद्यापीठात काही जागा राखीव असाव्यात. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आमच्या सामाजिक संस्थेने घेतली आहे. नुकतेच महाराष्ट्रातील एका शैक्षणिक संस्थेतील शहिद जवानांच्या पाच मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आमच्या संस्थेने घेतली आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी गाण्यांचा एक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहीदांच्या कुटुंबीयांसाठी निधी उभारण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे, एक थोडा वेगळा प्रश्न... जवानांबद्दल आपली इतकी आत्मीयता, तळमळ आहे. ते शत्रूपासून रक्षण करतात. मात्र त्याचवेळी पाकिस्तानी कलाकारांना घेऊन सिनेमा बनतात. त्यावर बंदीची भाषा फक्त होते....जवानांच्या कार्याला, मेहनतीला आपण न्याय देतो असं वाटतं का ? आपल्याकडे ठराविक वेळीच देशप्रेम उफाळून येते. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन किंवा मग सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतरच देशप्रेमाचे भरतं येतं. मग अमुक एक देशाच्या सिनेमाला विरोध, अमुक एक कलाकारांना विरोधाचे सूर उठतात. मात्र देशप्रेम दाखवायचे वेळ आली की सगळेच मागे हटतात. हेच पाहा ना, एखाद्या सिनेमाला विरोध केला जातो. मात्र काही दिवसांनी हाच सिनेमा रिलीज झाला की विरोध करणारे आपल्यातले सगळे थिएटरमध्ये जाऊन त्या सिनेमाला सुपरहिट करतात. तर हे कितपत योग्य आहे ? देशप्रेम नाहीच तर मग बेगडी देशप्रेम कशासाठी ? का सगळा ड्रामा केला जातो ? असा मला प्रश्न पडतो.