Join us  

'नाच गं घुमा'टीमकडून 'राणी'ला खास सरप्राइज, मुक्ता बर्वेच्या ग्रँड वेलकमसाठी एअरपोर्टवर पोहोचली नम्रता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 1:44 PM

१ महिन्याने मुक्ता बर्वे भारतात परतली, अभिनेत्रीला 'नाच गं घुमा'टीमकडून एअरपोर्टवर मिळालं खास सरप्राइज

सध्या सर्वत्र 'नाच गं घुमा' या मराठी सिनेमाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. 'नाच गं घुमा' सिनेमाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर ठाण मांडलं आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून थिएटरमध्येही सिनेमाचे शो हाऊसफूल होत आहेत. 'नाच गं घुमा'  सिनेमात मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव मुख्य भूमिकेत आहेत. पण, नाटकाच्या दौऱ्यामुळे परदेशात असलेल्या मुक्ताला 'नाच गं घुमा'च्या प्रमोशन आणि प्रिमियरसाठी उपस्थित राहता आलं नाही. अखेर मुक्ता आता भारतात परतली आहे. कित्येक दिवसांनी भारतात आलेल्या मुक्ताचं 'नाच गं घुमा'च्या टीमकडून जंगी स्वागत करण्यात आलं. 

'नाच गं घुमा' सिनेमा १ मेला सर्वत्र प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ९ दिवसांनी भारतात परतलेल्या मुक्ताला 'नाच गं घुमा'च्या टीमकडून एअरपोर्टवर सरप्राइज मिळालं. मुक्ताचं वेलकम करण्यासाठी नम्रता आणि मधुगंधा "वेलकम बॅक राणी" असा बॅनर घेऊन एअरपोर्टवर उभ्या होत्या. त्यांना पाहताच मुक्ताचा आनंद गगनात मावेनासा झाला. याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत मुक्ताचा आनंद स्पष्ट दिसत आहे. 

"आमची ‘राणी’ गेला एक महिना भरताबाहेर होती… प्रमोशन्स दरम्यान ‘आशाताईंनी’ आणि आम्ही सर्वांनीच तिला खूप मिस केलं. म्हणूनच ‘नाच गं घुमा’ टीम जाऊन पोचली Airport वर राणीच म्हणजेच आपल्या लाडक्या ‘मुक्ता बर्वे’ला surprise द्यायला!", असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. 

मुक्ता बर्वे गेल्या एक महिन्यापासून चारचौघी या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त अमेरिकेत होती. 'नाच गं घुमा' सिनेमात तिने राणी ही भूमिका साकारली आहे. तर या सिनेमात नम्रता तिच्या घरी काम करणारी बाई आशाच्या भूमिकेत आहे. याशिवाय या 'नाच गं घुमा' सिनेमात सारंग साठ्ये, मधुगंधा कुलकर्णी, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मायरा वायकुळ यांच्या भूमिका आहेत. 

टॅग्स :मुक्ता बर्वेनम्रता आवटे संभेरावमराठी चित्रपट