Join us  

'थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय!', 'दे धक्का २'चं मोशन पोस्टर रिलीज; रिलीजची तारीख आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 1:39 PM

सुमारे १४ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या दे धक्का चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत धमाल उडवली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येत असून, त्याचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.

सुमारे १४ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या दे धक्का (De Dhakka) चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत धमाल उडवली होती. मकरंद अनासपुरे(Makrand Anaspure), शिवाजी साटम (Shivaji Satam), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) अशा दिग्गज कलाकारांचा समावेश असलेल्या या विनोदी चित्रपटाने सर्वांची प्रशंसा मिळवली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येत असून, त्याचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. तसेच या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी 'दे धक्का २'(De Dhakka 2)चं मोशन पोस्टर रिलीज करत लिहिले की, थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय, १ २ ३ ४ - "दे धक्का २" येतोय ५ ऑगस्ट २०२२ ला ...दिग्दर्शक - महेश मांजरेकर , सुदेश मांजरेकर

या मोशन पोस्टरमध्ये या चित्रपटातील सर्व पात्रांची ओळख करून दिली आहे. या चित्रपटात मकरंद अनासपुरे मकरंद जाधवच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मेधा मांजरेकर सुमती जाधवच्या तर सिद्धार्थ जाधव धनाजीच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेते शिवाजी साटम सूर्यभान जाधव यांच्या रोलमध्ये दिसतील. गौरी इंगवले सायलीच्या तर सक्षम कुलकर्णी किसनाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

दे धक्का चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेले कलाकार या चित्रपटातही दिसणार आहेत. फक्त सायलीच्या भूमिकेत गौरी इंगवले दिसणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये हे कलाकार इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडनमध्ये धमालमस्ती करताना दिसणार आहेत. यापूर्वी दे धक्का चित्रपटानेही रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवले होते. त्या चित्रपटातील बरेच संवाद प्रेक्षकांच्या मनावर कायमचे कोरले गेले होते. त्यामुळे आता दे धक्का २ च्या माध्यमातून हे कलाकार विनोदाचा कसा धक्का देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

टॅग्स :महेश मांजरेकर मेधा मांजरेकरमकरंद अनासपुरेसाक्षी महाराज