Join us  

‘मोठी तिची सावली' आता हिंदीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 3:06 PM

हे पुस्तक  देशपातळीवरील वाचक आणि दीदीच्या चाहत्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास दीदीच्या भगिनी आणि संगीतकार मीना मंगेशकर- खडीकर यांनी व्यक्त केला आहे.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या भगिनी आणि विख्यात संगीतकार मीना मंगेशकर-खडीकर यांचं आत्मवृत्त गेल्या वर्षी प्रकाशित झालं. या पुस्तकाचा हिंदी अनुवाद प्रसिध्द झाला असून 'दीदी और मैं'चं प्रकाशन रविवार दिनांक २९ सप्टेंबर, २०१९ रोजी दीदींच्या हस्ते मुंबईत होणार आहे. यापूर्वी वाचकांनी 'मोठी तिची सावली'चं मनापासून स्वागत केलं आहे.

एक प्रयोगशील संगीतकार म्हणून मीनाताई अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. 'माणसाला पंख असतात', 'शाबाश सुनबाई', 'रथ जगन्नाथाचा', 'कानून का शिकार' अशा मोजक्या मराठी/ हिंदी चित्रपटांना मीनाताईंचं संगीत आहे. त्यांनी स्वरबध्द केलेली 'सांग सांग भोलानाथ', 'चॉकलेटचा बंगला' ही बाल-गीतं मोठ्यांनाही आवडली. या गीतांची लोकप्रियता आजदेखील टिकून आहे.

दीदी आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या कैक जाहीर कार्यक्रमांत मीनाताईंचा सहभाग होता. तसंच, अनेक हिंदी सिनेमातही त्यांनी दीदींबरोबर पार्श्वगायन केले आहे. ‘मदर इण्डिया' या गाजलेल्या चित्रपटातलं 'दुनिया में हम आए हैं तो जीना ही पड़ेगा' हे संगीतकार नौशाद यांनी स्वरबध्द केलेलं गीत दीदींबरोबर मीनताईंनीही गायलं आहे.

'दीदी और मैं' या पुस्तकात मीनाताईंनी साऱ्या देशाचं भूषण असलेल्या दीदींच्या उज्जवल कारकीर्दीचा समग्र आलेख आपल्या रसाळ शैलीत मांडलाय. दीदींशी निगडित अनेक अविस्मरणीय आठवणी आणि मंगेशकर कुटुंबाची दुर्मीळ छायाचित्रं यांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीच्या एका मोठ्या आणि वैभवशाली कालखंडाचा समग्र दस्तऐवज, असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. 

दीदींच्या नव्वदाव्या वाढदिवसाचा शुभयोग साधून 'दीदी और मैं' प्रकाशित होतंय याचा मला अतिशय आनंद आहे. हे पुस्तक म्हणजे मी दीदीला दिलेली प्रेमाची मौल्यवान भेट आहे. हिंदी अनुवादामुळे आता हे पुस्तक  देशपातळीवरील वाचक आणि दीदीच्या चाहत्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास दीदीच्या भगिनी आणि संगीतकार मीना मंगेशकर- खडीकर यांनी व्यक्त केला आहे.

मंगेशकर भावंडांचे सांगली, पुणे आणि कोल्हापुरातले बालपणीचे दिवस, तो काळ आणि त्यावेळचं सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरण; दीनानाथ मंगेशकरांच्या 'बलवंत कंपनी'चा सुवर्णकाळ, दीदींचा सुरूवातीच्या दिवसांतला संघर्ष, त्यांना मिळालेली संगीताची तालीम, आणि नंतरचं झगझगीत यश-पर्व; तसंच दीदींनी गाऊन अजरामर केलेल्या आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबध्द केलेल्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मीराबाई, मिर्झा गालिब, भगवद्गीता आणि राजा शिवछत्रपती या ध्वनिमुद्रिकांची माहिती; दीदींचे परदेशी दौरे, तसंच त्यांचं क्रिकेट प्रेम, नाना चौक ते 'प्रभुकुंज' हा मंगेशकर कुटुंबाचा प्रवास; दीदींच्या आवडी-निवडी, त्यांचे स्नेही नि सुहृद अशा तपशिलांमुळे हे पुस्तक रसप्रद झालंय. विख्यात अभिनेता अमिताभ बच्चन यांची चिंतनपर प्रस्तावना हे 'दीदी और मैं'चं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. सुप्रसिध्द पत्रकार आणि ज्येष्ठ साहित्यिक अंबरीश मिश्र यांनी मूळ मराठी पुस्तकाचा हिंदी अनुवाद सिध्द केलाय. 

     

टॅग्स :लता मंगेशकरमुंबई