Join us  

बऱ्याच वर्षांनंतर दोन मात्तबर कलाकार गाजवणार रंगभूमी, मोहन जोशी आणि सविता मालपेकर झळकणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 1:33 PM

चित्रपट, मालिका, नाटक या तिन्ही माध्यमातून आपल्या समर्थ अभिनयाचा ठसा या दोघांनी उमटवला आहे. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षांनी हे दोन मात्तबर कलाकार रंगभूमीवर दिसणार आहेत.

मराठी मनावर गारूड केलेलं 'गाढवाचं लग्न' हे वगनाट्य अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या अफलातून अदाकारीनं गाजलं. आपल्या अभिनयातून हुकूमत दाखवत प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करणाऱ्या या दोन ताकदीच्या कलाकारांची जोडी पुन्हा एकदा रसिकांचं मनोरंजन करायला एकत्र आली आहे. आगामी सुमी आणि आम्ही  या  नाटकातून  ही  जोडी पुन्हा रंगमंचावर एकत्र आली आहे. चित्रपट, मालिका, नाटक या तिन्ही माध्यमातून आपल्या समर्थ अभिनयाचा ठसा या दोघांनी उमटवला आहे. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षांनी हे दोन मात्तबर कलाकार रंगभूमीवर दिसणार आहेत. राजस प्रोडक्शन्स आणि मायबोली चित्र निर्मित सुमी आणि आम्ही हे नाटक २२ एप्रिलला रंगभूमीवर येणार आहे. नाटकाचे निर्माते राजस संजय गोडसे, शैलेश राजे आहेत. राजन मोहाडीकर यांनी हे नाटक लिहिले असून पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शित केले आहे. 

आपल्या भूमिकेविषयी सांगताना मोहन जोशी सांगतात की  आनंद धडफळे ही व्यक्तीरेखा मी साकारतोय. सविता आणि पुरुषोत्त्तम यांच्यासोबत काम  करायला मिळतंय,  विशेष म्हणजे राजन मोहाडीकर या माझ्या मित्राने हे नाटक लिहिल्याने एक उत्तम सकस नाटयकृती असणार हे लक्षात घेऊन मी हे नाटक करायला होकार दिला. जवजवळ १२ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर काम  करणाऱ्या सविता मालपेकर सांगतात, माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळया बाजाची भूमिका आणि त्यात पुन्हा पुरुषोत्तम बेर्डे आणि मोहन जोशी या माझ्या आवडत्या मंडळीसोबत काम करण्याची संधी मला मिळाली ती संधी सोडणं मी शक्य नव्हतं. मेधा धडफळे ही माझी व्यक्तीरेखा आहे. 

अभिनयातील परिपक्वता, सहजता यांचा सुरेख मिलाफ या दोघांच्या अभिनयातून पाहायला मिळतो. रंगभूमीवर बऱ्याच वर्षांनी काम करण्याचा आनंद व्यक्त करताना एका चांगल्या टीमसोबाबत काम केल्याचं समाधान देणारं हे नाटक प्रेक्षकांना ही अंतर्मुख करेल असा विश्वास हे दोघे व्यक्त करतात.

सुमी आणि आम्ही फॅमिली ड्रामा असलेलं दोन अंकी नाटक आहे. तरुण मुलगी गाठू पाहणारं एक वेगळंच ध्येय आणि त्यावेळचे तिचे आई- वडिलांशी संबंध असं खेळकर कुटुंब या नाटकातून पाहायला मिळेल या नाटकात मोहन जोशी, सविता मालपेकर या दोघांसोबत श्रद्धा पोखरणकर, उदय लागू, राजेश चिटणीस, प्रदीप जोशी, चंद्रशेखर भागवत कलाकार काम करणार आहेत. 

टॅग्स :मोहन जोशी