Join us  

'डॉ. काशिनाथ घाणेकर'वर अन्याय केल्यास खळ्ळ खट्याक; मल्टिप्लेक्स चालकांना अमेय खोपकरांचा अंतिम इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 1:13 PM

'...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या सिनेमाला अनेक मल्टीप्लेक्समध्ये प्राईम टाईम शो दिले जात नसल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी  '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाला स्क्रिन्स न देणाऱ्या मल्टिप्लेक्स धारकांना चांगलेच धारेवर धरले आहे. "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" ह्या चित्रपटावर अन्याय केल्यास "खळ्ळ खटॅक" होणार... असे अमेय खोपकर यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर"ला स्क्रीन्स आणि शोज द्या अन्यथा आम्हाला मनसे स्टाईलने धडा शिकवावा लागेल असे अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.

अभिजित देशपांडे दिग्दर्शित '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मात्र या सिनेमाला अनेक मल्टीप्लेक्समध्ये प्राईम टाईम शो दिले जात नसल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी  '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाला स्क्रिन्स न देणाऱ्या मल्टिप्लेक्स धारकांना चांगलेच धारेवर धरले आहे. या मल्टीप्लेक्स धारकांना अमेय खोपकर यांनी अंतिम इशारा दिला आहे. त्यांनी फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटला नुकतीच एक पोस्ट केली आहे आणि त्यात म्हटले आहे की, सर्व मल्टिप्लेक्स थिएटर मालकांसाठी अंतिम इशारा! "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" ह्या चित्रपटावर अन्याय केल्यास "खळ्ळ खटॅक" होणार. ह्या महत्त्वाच्या मराठी चित्रपटाला अन्यायाने डावलून हिंदी चित्रपटांना प्राधान्य दिल्यास ते सहन केले जाणार नाही. येत्या चोवीस तासात "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर"ला स्क्रीन्स आणि शोज द्या अन्यथा आम्हाला मनसे स्टाईलने धडा शिकवावा लागेल. 

मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ८ नोव्हेंबरला रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. सर्वत्र सिनेमाचे कौतुक केले जात आहे. मात्र अनेक मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये या सिनेमाला खूपच कमी स्क्रिन्स मिळाल्या आहेत. यामुळे सिनेरसिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

दुसरीकडे, अमिताभ बच्चन-आमिर खान यांच्या ठग्ज ऑफ हिंदोस्तान सिनेमाला अनेक स्क्रिन्स मल्टीप्लेक्स मध्ये देण्यात आल्या आहेत. या सिनेमामध्ये आमिर, अमिताभ, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख अशी मोठी स्टारकास्ट आहे, मात्र कथेमुळे प्रेक्षकांची निराशा झाल्याने ठग्ज ऑफ हिंदोस्तानकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली गेली आहे. एकूण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू पसरवण्यात कमी पडला आहे. या तुलनेत काशीनाथ घाणेकर सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले आहे. या चित्रपटाची कथा, सुबोध भावे, प्रसाद ओक, सुमीत राघवन या अभिनेत्यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावत आहे. 

टॅग्स :आणि डॉ. काशिनाथ घाणेकरसुबोध भावे