Join us  

#MeToo: आलोकनाथ यांच्याविरोधात सई ताम्हणकरने व्यक्त केली तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 6:14 PM

अभिनेते आलोकनाथ यांच्यावर ‘तारा’ या लोकप्रिय मालिकेच्या निर्मात्या व लेखिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे

ठळक मुद्दे तुम्ही नरकात सडणार - सई ताम्हणकर

टेलिव्हिजन व बॉलिवूडच्या जगतात संस्कारी बाबू अशी प्रतिमा असणारे अभिनेते आलोकनाथ यांच्यावर ‘तारा’ या लोकप्रिय मालिकेच्या निर्मात्या व लेखिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. मद्यात काहीतरी मिसळून आलोक नाथ यांनी आपल्यावर बलात्कार केला होता, असा विनता नंदा यांचा आरोप आहे. त्यानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आलोक नाथ यांच्याविरोधात तीव्र राग व्यक्त केला. त्यात मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिनेदेखील सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

सई ताम्हणकरने ट्विटरवर आलोकनाथ यांना उद्देशून लिहिले की, 'तुम्ही कधीच शांततापूर्ण आयुष्य जगू शकणार नाही. तुम्ही नरकात सडणार'.

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेने वेग घेतला आहे. इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणाच्या, गैरवर्तनाच्या अनेक प्रकरणांना तोंंड फुटतेय. नाना पाटेकर यांच्यानंतर दिग्दर्शक विकास बहल, गायक कैलाश खेर, मॉडेल जुल्फी सैय्यद यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप झालेत. आता बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबू’ अर्थात आलोक नाथ यांच्याबद्दलचेही असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. होय, पटकथा लेखिका आणि दिग्दर्शक-निर्मात्या विनता नंदा यांनी कथितरित्या बॉलिवूडच्या ‘संस्कारी बाबू’वर बलात्काराचा आरोप केला आहे. फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहून त्यांनी या प्रकरणाचा खुलासा केला आहे. २० वर्षांपूर्वी बॉलिवूड व टीव्हीच्या एका ‘संस्कारी अभिनेत्याने’ माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप १९९० मध्ये अपार लोकप्रीय झालेल्या ‘तारा’ या मालिकेच्या निर्मात्या विनता नंदा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे. विनता यांनी आपल्या पोस्टमध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. पण त्यांचा रोख बॉलिवूड व टीव्हीच्या दुनियेत ‘संस्कारी बाबू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलोकनाथ यांच्याकडे असल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :सई ताम्हणकरआलोकनाथमीटू