Join us  

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरियोग्राफर मयूर वैद्य लवकरच अडकणार लग्नबेडीत, भावी पत्नी दिसते खूप सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 11:01 AM

नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

नृत्य दिग्दर्शक, परीक्षक म्हणून प्रचलित असणारा मयूर वैद्य लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मधुरा देशपांडेसोबत मयूर वैद्य लवकरच लग्न करणार आहे. मधुरा देशपांडे ही देखील कथ्थक विशारद असून संगीत विषयातून एमए केले आहे. मयूर वैद्य यांनी झी युवा वरील युवा डान्सिंग क्वीन या रिऍलिटी शोचे परीक्षक म्हणून काम पाहिले होते.

नृत्य कलेत येण्यासाठी मयूर वैद्यच्या आईचा त्याला भक्कम पाठिंबा होता. आशा जोगळेकर यांच्याकडून त्याने नृत्याचे धडे गिरवले आहेत. लहानपणी घरी पाहुणे आले की मयूर त्यांच्यासमोर चित्रपटातल्या गाण्यांवर डान्स करून दाखवत त्यावेळी वडिलांना त्याचा डान्स करणे मुळीच आवडत नसे. त्यामुळे आपला मुलगा नृत्य शिकतोय हे त्यांना कळूच दिले नव्हते. मात्र एक दिवस मयूर घरी पायात घुंगरू बांधून नृत्य करू लागला त्यावेळी वडिलांनी ते पाहिले आणि खूप नाराज झाले. ही बाब जेव्हा आशा जोगळेकर यांना समजली तेव्हा मयुरच्या वडिलांना त्यांनी नृत्य शाळेत बोलवून घेतले. त्यानंतर वडिलांचा राग नुसता शांत झाला नाही तर त्यांनी या कलेला पाठिंबा देखील दिला. 

मयूरने लोकनृत्य, रशियन बॅले यांचेही शिक्षण घेतले आहे. वेगवेगळ्या नृत्य कार्यशाळेतूनही त्याने सहभाग घेतला आहे. ज्येष्ठ नृत्यगुरू पं. बिरजू महाराज यांच्या कार्यक्रमातूनही तो सहभागी झाला. ‘नटरंगी नार’, ‘इथं हवंय कुणाला प्रेम’, ‘सख्या सजणा’, ‘जादू तेरी नजर’, ‘वन टू का फोर’, ‘दिवसा तू रात्री मी’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘लव्ह स्टोरी’, ‘पुन्हा सही रे सही’ आदी ‘सुयोग’च्या नाटकांसाठी तसेच ‘संभवामी युगे युगे’या महानाटय़ासाठी, काही गुजराथी आणि इंग्रजी रंगभूमीसाठी आणि ‘सावरिया डॉट कॉम’, ‘रणभूमी’, ‘श्रीमंत दामोदरपंत’, ‘बाय गो बाय’ आदी चित्रपटांसाठी त्याने नृत्य दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. एक कोंकणी आणि एक हिंदूी चित्रपटही त्यांच्या नावावर आहे.

विविध पुरस्कार सोहळे, कार्यक्रम, दूरचित्रवाहिन्यांवरील जाहिराती, फॅशन शो, खासगी मराठी, गुजराथी अल्बम आणि ‘माझे जीवन गाणे’, ‘शब्द सुरांची नाती’, ‘स्वर संग्राम’ आदी रिअ‍ॅलिटी शो साठीही नृत्य दिग्दर्शक म्हणून आपली मोहर उमटविली आहे. ‘ढोलकीच्या तालावर’, ‘दम दमा दम’, ‘छोटे चॅम्पियन’, ‘एका पेक्षा एक-अप्सरा आली’, ‘एका पेक्षा एक-जोडीचा मामला’ या दूरचित्रवाहिन्यांवरील रिअ‍ॅलीटी शोसाठी परीक्षक म्हणूनही मयूरने काम केले आहे.