मराठमोळी रीना अगरवाल दिसणार श्रृती हसन सोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 14:44 IST
मराठी कलाकारांना हिंदी चित्रपटसृष्टी खुणावत आहे, आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीतील अनेक कलाकारांनी बॉलीवूडमध्ये यशस्वी कूच देखील केली आहे. अशा ...
मराठमोळी रीना अगरवाल दिसणार श्रृती हसन सोबत
मराठी कलाकारांना हिंदी चित्रपटसृष्टी खुणावत आहे, आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीतील अनेक कलाकारांनी बॉलीवूडमध्ये यशस्वी कूच देखील केली आहे. अशा या मराठी व्हाया हिंदी सिनेसृष्टीत प्रवास करणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेत्री रीना अगरवाल हिचा देखील समावेश होतो. नुकत्याच 'झाला भोबाटा' या मराठी सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली रीना लवकरच हिदीच्या बिग बजेट सिनेमात झळकणार आहे. अजय के. पन्हालाल दिग्दर्शित 'बेहेन होगी तेरी' या रॉमकॉम बॉलीवूड सिनेमात रीना पुन्हा एकदा बॉलीवूडच्या प्रसिद्ध कलाकारांसोबत केमेरा शेअर करताना दिसणार आहे. श्रुती हसन आणि राजकुमार राव ही जोडगोळी असलेल्या या सिनेमात मराठमोळ्या रीनाची कोणती भूमिका असेल हे लवकरच कळेल! या सिनेमाचे सध्या लखनऊ येथे चित्रीकरण सुरु असून, बिग बॉस फेम गौतम गुलाटी देखील यात पाहायला मिळणार आहे. बॉलीवूड चित्रपटात काम करण्याची रीनाची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी रिनाने अमीर खानच्या 'तलाश' या सिनेमात दिसून आली होती, यात ती एका महिला पोलीस हवालदाराच्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांसमोर आली होती. रिना हिंदीच्या छोट्या पडद्यावरील 'एजंट राघव' या मालिकेतूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हिंदी सिनेसृष्टी खुणावत जरी असली तरी रिनाने मराठी इंडस्ट्रीला कधीच दुय्यम लेखले नाही. ‘अजिंठा’ या मराठी चित्रपटातून अभिनयाला सुरुवात करणाऱ्या रिनाने मराठी रंगमंचावरदेखील काम केले आहे. तसेच वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेल्या 'झाला भोबाटा' या मराठी सिनेमातून ही ती प्रेक्षकांच्या भेटीस आली असल्यामुळे यंदाचे वर्ष तिच्यासाठी मोठे संधी उपलब्ध करून देणारे ठरत आहे.