Join us  

‘जंगजौहर’मधून पावनखिंडीचा रणसंग्राम रुपेरी पडद्यावर, नुकताच पार पडला मुहूर्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 7:15 AM

नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम इतिहासात अजरामर आहे.

महाराष्ट्राच्या रांगड्या भूमीला धगधगता आणि संघर्षमयी इतिहास लाभला आहे. अतुलनीय शौर्य आणि धैर्य दाखवत आजवर अनेक शूरवीरांनी महाराष्ट्राच्या मातीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. छत्रपती शिवरायांच्या एका शब्दाखातर जीवाची बाजी लावणारे  अनेक वीरयोद्धे या भूमीने महाराष्ट्राला दिले आहेत. ज्यांचे धैर्य, शौर्य आणि आवेश पाहून शत्रूही थबकला होता अशा झुंजार बांदल सेनेच्या आणि नरवीर बाजीप्रभूंच्या अजोड पराक्रमाचा अध्याय उलगडून दाखविणाऱ्या ‘जंगजौहर’  या ऐतिहासिक चित्रपटाचा मुहूर्त नुकताच स्वराज्याच्या राजधानीत म्हणजे किल्ले रायगडावर ढोल-ताशांच्या गजरात व मंत्रोच्चाराच्या जयघोषात संपन्न झाला. ‘आलमंड्स क्रिएशन्स’ निर्मित ‘जंगजौहर’ जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित शिवरथ यात्रा दरवर्षीप्रमाणे किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड अशी आयोजित करण्यात आली. त्याचा सांगता सोहळा एका दिमाखदार कार्यक्रमात रायगडावर संपन्न झाला. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत, ‘शिवाजी महाराज की जय’ च्या जयघोषात आणि मंत्रोच्चारात शिवपालखीचे पूजन करण्यात आले. ‘जंगजौहर’ चित्रपटाची कलाकार टिमही त्यात उत्साहाने सहभागी झाली होती. शिवपालखीच्या पूजनानंतर ‘जंगजौहर’ चित्रपटाच्या संहितेचे विधीवत पूजन दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेता  चिन्मय मांडलेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अंकित मोहन, हरीश दुधाडे, ऋषी सक्सेना, विक्रम गायकवाड, रोहन मंकणी आणि सुश्रुत मंकणी आदि कलाकार उपस्थित होते.

नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम इतिहासात अजरामर आहे. पावनखिंडीचा रणसंग्राम घडून कित्येक वर्षाचा काळ लोटला असला तरी या रणसंग्रामाचा आणि बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा, बलिदानाचा इतिहास आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. पन्हाळगडाला सिद्दी जोहरने वेढा दिला, तेव्हा छत्रपती शिवाजीराजे यांनी मोठ्या शिताफीने स्वत:ची सुटका करुन घेऊन विशाळगडाकडे कूच केले. पाठलागावर असलेल्या विजापूरी सैन्याचा धोका लक्षात घेत बाजींनी महाराजांना पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोन्ही बंधू बांदल सेनेसह घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्याविरोधात महाकाळ म्हणून उभे ठाकले. हजारोच्या सैन्याचा मुकाबला करताना बाजी आणि ३०० बांदल सेनेच्या वीरांनी पराक्रमाची शिकस्त करत महाराज विशालगडावर पोहचेपर्यंत घोडखिंड प्राणप्रणाने लढवली. छत्रपतींना वाचवताना बांदल सेना व बाजीप्रभू पन्हाळगडाच्या थरारात धारातीर्थ झाले आणि घोडखिंडीतला हा लढा बाजीप्रभू यांच्या स्वराज्यनिष्ठेच्या पवित्र रक्ताने ‘पावन’ झाला.

"इतिहास हा केवळ सांगण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नसतो तर तो अनुभवायला देखील लागतो", हा अनुभव आजच्या पिढीला देण्याच्या उद्देशाने ‘जंगजौहर’चे शिवधनुष्य पेलल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सांगितले. साहसी रणसंग्रामाचा अध्याय प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने ‘जंगजौहर’ चित्रपटासाठी पुन्हा पुढाकार घेतल्याचे चित्रपटाचे निर्माते अजय-अनिरुद्ध आरेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :चिन्मय मांडलेकरदिग्पाल लांजेकर