Join us  

अभिनेत्री स्मिता शेवाळेच्या 'बेरीज वजाबाकी'चा ट्रेलर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 4:46 PM

बेरीज वजाबाकी’ येत्या १३ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. या कधीही न संपणाऱ्या स्पर्धेची सुरुवात लहान मुलांच्या शालेय वयापासून सुरु होत असते. मुलांच्या आवडी निवडीचा विचार न करता पालक मुलांवर त्यांच्या इच्छा, अपेक्षा कायम लादत असतात. पालकांच्या शिस्ती बरोबरच आई – वडिलांमधील सुसंवाद, दुरावा, नात्यातील ताणतणाव याचा किशोरवयीन मुलांवर नेमका काय परिणाम होते याची हलक्याफुलक्या अंदाजात मांडणी असलेल्या, राजू भोसले दिग्दर्शित ‘बेरीज वजाबाकी’ या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

जंपिंग टोमॅटो मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत इन असोसिएशन विथ पीएमआरवाय प्रॉडक्शन्स निर्मित ‘बेरीज वजाबाकी’ ची कथा टीनएजर्स भोवती गुंफण्यात आली आहे. शाळेत मुलांच्या पाठीवर पुस्तकांचे, दप्तराचे ओझे नको असे प्रत्येकाला वाटते परंतु त्याला सक्षम पर्याय दिला जात नाही. लाखो रुपये डोनेशन भरून एखाद्या हायफाय शाळेत मिळणार नाही असे शिक्षण बिना भिंतीच्या शाळेतही मुलांना मिळू शकते, ‘मुक्त शाळा’ प्रयोगाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलांचे भावविश्व वेगळ्या पद्धतीने उलगडण्यात आल्याचे या ट्रेलर मध्ये दिसते.

आजच्या धावपळीच्या जीवनातील व्यस्त पालक आणि मुलांमधील नाते वेगळ्या नजरेतून उलगडणाऱ्या या चित्रपटात मोहन जोशी, नंदू माधव, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, देविका दफ्तरदार, गिरीश परदेशी, मिलिंद गवळी, स्मिता शेवाळे, रमेश परदेशी, डॉ. प्रचीती सुरु, गायत्री देशमुख, सारिका देशमुख, अमित वझे, नीता दोंदे, जयेश संघवी, भक्ती चव्हाण आदी कलाकार असून नील बक्षी, जाई रहाळकर, अमेय परदेशी, आदिश्री देशमुख, यश भालेराव, आर्या काकडे, शर्व कुलकर्णी, तन्वी सावरगावकर, रामदास अंधारे, सोहम महाजन, ओंकार जाधव, ओम चांदणे या बालकलाकारांच्या भूमिका आहेत.

‘बेरीज वजाबाकी’चे निर्माते राजू भोसले असून रोहनदीप सिंग, विशाल हनुमंते, दत्तात्रय बाठे, प्रदीप मठपती हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि संवाद प्रताप देशमुख यांचे आहेत तर पटकथा राजू भोसले, प्रताप देशमुख यांची आहे. चित्रपटाला अभिजित नार्वेकर यांनी संगीत दिले असून अंबरीश देशपांडे यांची गीते आहेत. ‘आकाश हे...’ या गीताला राशी हरमलकर, विश्वजा जाधव, मानस भागवत यांनी तर ‘क्षण हा विरला’ गाण्याला सोनू निगम, आनंदी जोशी यांनी आपल्या सुरेल आवाजात स्वरबद्ध केले आहे. प्रत्येक पालकाने बघायला हवा असा ‘बेरीज वजाबाकी’ येत्या १३ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :उपेंद्र लिमये