Join us  

भूक मारण्यासाठी सविता मालपेकर घ्यायच्या झोपेच्या गोळ्या; जुने दिवस आठवून झाल्या भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 12:03 PM

Savita malpekar:नाटकातून मिळणारे सगळे पैसे त्या त्यांच्या गावी घरखर्चासाठी पाठवायच्या. परिणामी, स्वत:च्या गरजा भागवण्यासाठी त्यांना सतत तडजोड करावी लागायची.

उत्तम अभिनयासह स्पष्टवक्तेपणा आणि रोखठोक बोलण्याची पद्धत यामुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे सविता मालपेकर (savita malpekar). अनेक गाजलेल्या सिनेमांसह मालिकांमध्ये काम करणाऱ्या सविता मालपेकर आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि नावाजलेली अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. परंतु, एक काळ असा होता जेव्हा त्यांनी बरेच हालाखीचे दिवस काढले. इतकंच नाही तर भूक लागू नये यासाठी त्यांनी चक्क झोपेच्या गोळ्याही खाल्ल्या होत्या.

अलिकडेच सविता मालपेकर यांनी अमृता फिल्म या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं. इतकंच नाही तर काही खुलासेही केले. यामध्येच एकेकाळी त्यांची घरची परिस्थिती किती बिकट होती हे सांगितलं.

सविता मालपेकर यांच्या वडिलांचं फार लवकर निधन झालं. परिणामी, घरची आणि चार भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यामुळे लहान वयातच त्या दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करणं, शेतमजुरी यांसारखी काम करु लागल्या. सविता यांचे वडील आणि राजा गोसावी यांची चांगली मैत्री होती. त्यामुळे वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांनी सविता यांना नाटकात काम करायची संधी दिली, डार्लिंग डार्लिंग या नाटकाच्या माध्यमातून सविता यांनी पहिल्यांदाच व्यावसायिक नाटक केलं. त्यापूर्वी त्या रत्नागिरीमध्ये लहानमोठी नाटकं करायच्या. राजा गोसावी यांच्या नाटकाच्या निमित्ताने त्या मुंबईत आल्या. मुंबईत आल्यानंतर नाटकातून जे पैसे मिळायचे ते पैसे त्या गावी घरखर्चासाठी पाठवायच्या. याच कारणामुळे मुंबईत रहात असताना त्यांना रोज पै-पै रुपयांसाठी संघर्ष करावा लागायचा.

सुरुवातीचा काही काळ सविता या मुंबईत त्यांच्या मामाकडे तर कधी मावशीकडे रहायच्या. गावी सगळे पैसे पाठवत असल्यामुळे सविता यांच्याकडे सकाळच्या नाश्तासाठीही पैसे नसायचे. ही गोष्टी भक्ती बर्वे, सदाशिव अमरापूरकर या कलाकारांना झाली. त्यामुळे मग तेच सविता यांनी नाश्ता करण्यासाठी घेऊन जायचे. पण, ही मंडळी आज, उद्या खाऊ घालतील. त्याच्यापुढे काय? असा प्रश्न सविता यांना पडला. त्यामुळे यावर त्यांनी एक युक्ती लढवली.

भूक लागल्यावर खायच्या झोपेच्या गोळ्या

त्यावेळी कोणीही आपल्याला मुद्दाम जेवण देऊ नये किंवा भूक लागू नये यासाठी सविता मालपेकर या कंपोज नावाच्या झोपेच्या गोळ्या खायच्या. त्यावेळी २ रुपयांना १० गोळ्यांचं पाकिट मिळायचं. या गोळ्या खाऊन त्या सकाळचा नाश्ता स्किप करायच्या.

दरम्यान, खूप मेहनत, स्ट्रगल केल्यानंतर अभिनयात त्यांना चांगली संधी मिळत गेली. याच जोरावर त्यांनी चारही भावंडांना त्यांच्या पायावर उभं केलं. विशेष म्हणजे दोन वेळच्या जेवणासाठी वणवण करणाऱ्या सविता आज मराठी इंडस्ट्रीची अन्नपूर्णा म्हणून ओळखल्या जातात. सेटवर सगळ्यांना त्या स्वत:च्या हाताने चांगले चांगले पदार्थ खाऊ घालतात. सविता यांनी अनेक गाजलेल्या सिनेमा, मालिकांमध्ये काम केलं आहे. यात मुलगी झाली हो, लक्ष्मी वर्सेस सरस्वती, गाढवाचं लग्न, मुळशी पॅटर्न, काकस्पर्श अशा सिनेमा, मालिकांचा समावेश आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनमुंबई