महेश मांजरेकर यांचा राहुल गांधींविरोधात ट्विटरबॉम्ब !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 10:50 IST
अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणजे मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव. गेल्या अनेक वर्षांपासून महेश मांजरेकर ...
महेश मांजरेकर यांचा राहुल गांधींविरोधात ट्विटरबॉम्ब !
अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणजे मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव. गेल्या अनेक वर्षांपासून महेश मांजरेकर चित्रपटसृष्टीत काम करतायत. आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शन कौशल्यामुळे मांजरेकर यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख आणि दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे ते जे काही बोलतात ते विचारपूर्वक आणि तोलून मापून बोलतात असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. शिवाय विविध पुरस्कार सोहळ्यात त्यांच्यातील हजरजबाबीपणा सा-यांनीच अनुभवला आणि पाहिला आहे. शिवाय त्यांच्यावर एखादा विनोद केला गेल्यास तोसुद्धा तो मोठ्या खिलाडूवृत्तीने घेतात हेसुद्धा चित्रपटसृष्टीत सा-यांनाच माहिती आहे. नुकतंच महेश मांजरेकर यांनी केलेलं ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी काँग्रेस उपाध्यक्ष यांच्याबाबत एक विधान केलं होतं. शीला दीक्षित यांच्या विधानाचा धागा पकडून महेश मांजरेकर यांनी एक ट्विट केलं. राहुल गांधी आता 46 वर्षांचे आहेत. ते काय मग तुमच्या वयाचे झाल्यावर परिपक्व (mature) होणार का? असा सवाल महेश मांजरेकर यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे. महेश मांजरेकर यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल गांधी हे अद्याप समजूतदार आणि परिपक्व (Mature) झाले नसून त्यांना आणखी काही वेळ देण्याची गरज असल्याचे शीला दीक्षित यांनी म्हटलं होतं. राहुल गांधी यांचे वय त्यांना परिपक्व होण्यात अडसर ठरत असल्याचेही एका मुलाखतीमध्ये शीला दीक्षित यांनी म्हटलं होतं. याशिवाय राहुल गांधी लवकरच काँग्रेसचं अध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतील असं शीला दीक्षित यांनी म्हटलं आहे.