दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते अशी बहुगुणी ओळख असणारे महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी दोन वर्षांपूर्वीच 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedat Marathe Veer Daudale Saat) या सिनेमाची घोषणा केली होती. या सिनेमात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर प्रवीण तरडेंसह सहा वीरांची यामध्ये कथा दाखवण्यात येणार आहे. महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकरही यात दिसणार होता. नंतर त्या सिनेमाचं पुढे काय झालं असा प्रश्न अनेकांना पडला असेल. सिनेमात अभिनेता विराट मडके (Virat Madake) जिवाजी पाटीलच्या भूमिकेत दिसणार आहे. विराटने नुकतंच सिनेमाबद्दल अपडेट दिली आहे.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत विराट मडके म्हणाला, "सिनेमाचं शूट पूर्ण झालं आहे. आता पॅचवर्कचंच काम आलं तर येऊ शकतं. मला मागच्याच महिन्यात सरांचा फोन आला होता. आतापर्यंत चित्रीत झालेले सगळे फुटेज बघून त्यांनी लाईन आऊट केला आहे. तुझं काम खूप भारी झालंय तेवढंच सांगायला फोन केला असं ते मला म्हणाले. पुढच्या वर्षी आपण काहीतरी करतोय. असं म्हणत त्यांनी फोन ठेवून दिला."
सिनेमा बंदच झाला अशीही मध्यंतरी चर्चा झाली होती. यावर विराट म्हणाला, "हो तीही शक्यता होती. असं मधल्या काळात झालं होतं. पण महेश सरांनी त्यावर वर्षभर वेळ घेऊन तोडगा काढला. याचं कारण म्हणजे ते फुटेज जोडल्यानंतर त्यांना एकंदर आऊटकम खूप आवडलं. ते खूप खूश होते म्हणूनच त्यांनी फोन केला होता. सिनेमा मस्त आहे लोकांना खूप आवडेल असंही ते म्हणाले. मीही दोन-अडीच वर्षांपासून सिनेमाची वाट बघतोय. त्यामुळे माझ्यासाठीही ही दिलासा देणारीच बातमी होती.
कसा आहे सिनेमा?
सिनेमा खूप सुंदररित्या चित्रीत झाला आहे. तांत्रिकदृष्ट्याही सिनेमा खूपच चांगला बनला आहे. महाराजांच्या काळातील कोणतीच गोष्ट तुम्ही काल्पनिक म्हणून दाखवू शकत नाही या गोष्टीला वाव होता. प्रतापरांबरोबर ६ जण होते जे लढले. ते कोण होते हे कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. कुठेच त्याची अधिकृत नोंद नाही. बाबासाहेब पुरंदरेंनी जी नावं लिहिली तीच लोकप्रिय झाली आहेत. महेश सरांनी त्यांच्या पद्धतीने अभ्यास करुन हे सहा वीर दाखवले आहेत. प्रत्येकाची कथा खूप छान गुंफली आहे. सिनेमातली दोन गाणी काळजाला भिडणारी आहेत. अक्षय कुमारनेही त्याची भूमिका चांगली निभावून नेली आहे. त्याला मराठी येत नाही वगरे असंही वाटत नाही."