Join us  

लक्ष्मीकांत बेर्डे या महिलेमुळे झाले सुपरस्टार, जाणून घ्या कोण आहे ही महिला?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 7:00 AM

आपल्या विनोदी शैलीने तब्बल दोन दशके प्रेक्षकांना अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी खळखळून हसवले.

आपल्या विनोदी शैलीने तब्बल दोन दशके प्रेक्षकांना दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी खळखळून हसवले. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे झपाटलेला, धुमधडाका, अशी ही बनवाबनवी, थरथराट, अफलातून आजही प्रेक्षक आवडीने पाहत आहेत. अनेकदा चाहत्यांना प्रश्न पडतो की या अभिनेत्याला इतके भन्नाट विनोद सुचायचे कसे? या प्रश्नाचे उत्तर स्वत: लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या विनोदाचे श्रेय आपल्या आईला दिले होते. त्यांच्या आईचे नाव होते रजनी. त्यांचे संपूर्ण आयुष्य हलाखीत गेले. तरीही त्यांनी अमाप कष्ट करुन आपल्या मुलांचे संगोपन केले. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना कधीच आपली स्वप्न पूर्ण करता आली नाही. मात्र याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर कधीच दिसून आली नाही. त्या नेहमी हसतमुख राहायच्या आणि त्यांचा स्वभाव फार मिष्किल होता. इतकेच नाही तर अगदी लहान लहान गोष्टींमध्ये त्या आनंद शोधायच्या. आई कडूनच त्यांना विनोदाचा हा वारसा मिळाला. त्यामुळे विनोद करण्यासाठी भव्य दिव्य संवाद असायला हवेत असे त्यांना कधी वाटायचे नाही. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी कायम आपल्या आईसारखाच विनोद करण्याचा प्रयत्न केला.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या आईच्या विनोदी प्रवृत्तीचे दर्शन घडवण्यासाठी एक मजेशीर किस्सा सांगितला. त्यांची आई आजारी होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांना एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. मात्र त्यावेळी डॉक्टरांचा संप सुरु होता त्यामुळे उपचारात अडथळे येत होते. तेवढ्यात रजनी असा आवाज देण्यात आला. त्यामुळे लगेचच त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्यांच्या ऐवजी दुसऱ्याच कुठल्या तरी महिलेला बोलावण्यात आले होते. त्यावेळी लक्ष्मीकांत आणि त्यांचे भाऊ थोडे गोंधळून गेले होते. मात्र त्याक्षणी देखील त्यांनी आपल्या विनोदाचे दर्शन घडवले आणि त्या जोरजोरात हसू लागल्या. कारण आतमध्ये ज्या रजनीला बोलावण्यात आले होते ती बाई गरोदर होती. या वयात माझी डिलेव्हरी करणार का? असे म्हणत त्या हसू लागल्या.

अत्यंत आजारी असतानाही आजूबाजूचे वातावरण प्रसन्न ठेवण्याचा त्यांचा हा खटाटोप हेच लक्ष्मीकांत यांच्या विनोदामागचा खरा प्रेरणास्त्रोत असे ते मानायचे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये जे अफाट यश मिळवले त्याचे संपूर्ण श्रेय त्यांनी आपल्या आईला दिले होते. मात्र त्याचे हे यश आई कधीही पाहू शकली नाही, ही खंत त्यांच्या मनात कायम राहिली होती.

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डे