Join us  

​बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाचा 'विच्छा माझी पुरी करा' ने शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2018 5:07 AM

राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करत, प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे 'विच्छा माझी पुरी करा'  हे सदाबहार वगनाट्य सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे ...

राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करत, प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे 'विच्छा माझी पुरी करा'  हे सदाबहार वगनाट्य सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. वसंत सबनीस लिखित आणि दादा कोंडके यांनी अजरामर केलेल्या या चिरतरुण लोकनाट्याची पर्वणी आता कुडाळमधील रसिकांना लाभणार आहे. बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाचा शुभारंभ ‘विच्छा माझी पुरी करा’ या लोकनाट्याने होणार आहे. कुडाळमधील बाबा वर्दम रंगमंच (सांस्कृतिक भवन) येथे ७ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सव गेली २० वर्षं येथे साजरा केला जातोय.अभिनेते विजय कदम गेली काही वर्षं सातत्याने 'विच्छा माझी पुरी करा' चे प्रयोग करत आहेत. या लोकनाट्याचे १९८६ पासून आतापर्यंत विजय कदम यांनी ७५० हून जास्त प्रयोग केले आहेत. विजय कदम यांच्या 'विच्छा माझी पुरी करा' ला लोकांनी डोक्यावर घेतले आहे. विजय कदम यांच्या अभिनयाने या नाटकाला चार चाँद लावले आहेत. विजय कदम यांच्यासह प्रियांका शेट्टी, मंगेश हाटले, चेतन म्हस्के, तुषार खेडेकर, संजय परब हे सहकलाकार देखील 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकात आहेत. दीप वझे आणि शशांक पडवळ वादक सहकलाकार आहेत. दिग्दर्शकाची जबाबदारी स्वतः विजय कदम यांनी सांभाळली असून सूत्रधार गोट्या सावंत आहेत. विजय कदम यांनी केलेल्या दिग्दर्शनाचे देखील लोक भरभरून कौतुक करतात.विजय कदम यांनी आजवर अनेक 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाचे अनेक प्रयोग सादर केल्यानंतर आता ते बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवात या नाटकाचा प्रयोग सादर करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. ते सांगतात, 'विच्छा माझी पुरी करा’ या लोकनाट्याने बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाचा होणारा शुभारंभ माझ्यासाठी आनंददायी असून कुडाळकर रसिक त्याला चांगला प्रतिसाद देतील असा मला विश्वास आहे. आम्ही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झालो आहोत.Also Read : या मालिकेद्वारे विजय कदम यांचे छोट्या पडद्यावर कमबॅक