Join us  

‘लागीर झालं जी’ मालिकेतील हे कलाकार रूपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज, या सिनेमात असणार खास भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 12:28 PM

फिल्मचं लोकेशन साताऱ्यात असल्या कारणामुळं मालिकेसाठी ऑडिशन देणं सर्वांना सोईस्कर झालं.

छोट्या पडद्यावर ‘लागीर झालं जी’ ही मालिका तुफान गाजली. मालिकेतील सगळ्याच भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या होत्या. आता या मालिकेतील काही कलाकार रूपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. सध्या फिल्मी विश्वात चर्चेत असलेला चित्रपट "पळशीची पीटी" एक वेगळ्या गोष्टीमुळे देखील चर्चेत आहे.

 

सोशल मीडियावर एक एक करत दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांनी कलाकारांच्या रूपाने सगळे पत्ते खोलले आणि सर्वत्र एकचं चर्चा सुरू झाली . सुप्रसिद्ध मालिका 'लागीर झालं जी' मधील जेमतेम सर्वच कलाकार या चित्रपटात आहेत . मालिका संपल्यावर काय...? असा प्रश्न सर्व प्रेक्षकांना होताच, पण यावर दिग्दर्शकांनी मौन सोडलं आहे.

खरं तर 'लागीर झालं जी' मालिका सुरू होण्याआधीच सर्व कलाकार पळशीची पीटी साठी काम करत होते. फिल्मचं लोकेशन साताऱ्यात असल्या कारणामुळं मालिकेसाठी ऑडिशन देणं सर्वांना सोईस्कर झालं. सर्व कलाकारांच्या उत्तम अभिनयकौशल्याच्या जोरावर त्यांना मालिकेत देखील संधी मिळाली आणि या संधीचे सोने केल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहेच.

२३ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून  "पळशीची पीटी" मध्ये 'भागी' ची भूमिका साकारणारी किरण ढाणे,राहुल बेलापूरकर,राहुल मगदूम, धोंडिबा कारंडे, विद्या सावळे, शिवानी घाटगे , दिक्षा सोनवणे,निलीमा कमाणे इत्यादींचा समावेश आहे तसेच तेजपाल वाघने देखील चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली असून लागीर. मध्ये 'जितू काका' यांची भूमिका साकारणारे संदीप जंगम यांनी चित्रपटाची सर्वात महत्वाची बाजू म्हणजे छायाचित्रण तसेच एडिटिंग केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्व लागीर ची टीम प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तयार झालेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

टॅग्स :लागिरं झालं जीपळशीची पीटी