Join us  

किशोर नांदलस्कर यांची ही इच्छा राहिली अपुरी, वाचून तुमच्या डोळ्यांत देखील येईल पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 11:29 AM

किशोर यांनी अनेक वर्षं चित्रपटसृष्टीत काम केले असले तरी त्यांची एक इच्छा अपुरीच राहिली.

ठळक मुद्देकिशोर नांदलस्कर यांनी सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमधून काम केले.

किशोर नांदलस्कर यांनी मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे काल ठाणे येथे कोरोनाने निधन झाले. किशोर नांदलस्कर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना ठाण्यातील बाळकुम परिसरातील ग्लोबल कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्यांची प्राणज्योत मालवली.

किशोर यांनी अनेक वर्षं चित्रपटसृष्टीत काम केले असले तरी त्यांची एक इच्छा अपुरीच राहिली. त्यांच्या या इच्छेविषयी दिग्दर्शक विजू माने यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. विजू माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यात लिहिले आहे की, किशोर नांदलस्कर गेल्याची बातमी आली. क्षणभर निशब्द व्हायला झालं. मी २०१४ साली एक सिनेमा केला होता. ज्यात त्यांनी काम केलं होतं. अर्थात त्याआधी मी त्यांच्यासोबत एक व्यावसायीक नाटकसुद्धा केलं होतं. त्याच्याही अनेक आठवणी आहेत. पण ही आठवण विशेष रुखरुख लावणारी आहे. त्या सिनेमात मी एक गाणं केलं होतं. ज्यात एका वृद्धाश्रमात एका जोडप्याचा लग्नाचा वाढदिवस सुरू आहे. मला तेव्हा रमेश देव यांनी निक्षून  सांगितलं होतं की, मला या गाण्यावर नृत्य करायचंय. ते गाणं चित्रित होत असताना रमेश देव, सीमा देव, उदय सबनीस, विजू खोटे, स्वतः नांदलस्कर  सगळी मंडळी नृत्य एन्जॉय करत होती. एका ब्रेक मध्ये किशोर नांदलस्कर मला बाजूला घेऊन गेले आणि म्हणाले, “रमेश देवांचं वय किती असेल रे ?” मी म्हटलं “असेल ८० वगैरे.” मग त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले,”मी ८० वर्षाचा होईन तेव्हा माझ्यासाठी असं एखादं गाणं करशील असं मला वचन दे” आणि त्यांचे ते भरून आलेले डोळे अजूनही आठवतायत. एका इतक्या भन्नाट कलाकाराची केवढीशी अपेक्षा होती...तेव्हा मी त्यांना वचन दिलं. पण पूर्ण करण्याची वेळच आली नाही .... सतत अचूक टायमिंगने सेटवरचं वातावरण हलकं फुलकं करणारी अशी निरागस व्यक्ती सोडून जाते तेव्हा अस्वस्थ व्हायला होतं...सगळ्यांनी काळजी घ्या....

किशोर नांदलस्कर गेल्याची बातमी आली. क्षणभर निशब्द व्हायला झालं. मी २०१४ साली एक सिनेमा केला होता. ज्यात त्यांनी काम केलं...

Posted by Viju Mane on Tuesday, April 20, 2021

किशोर नांदलस्कर यांनी सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमधून काम केले. ‘नाना करते प्यार’, ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’, प्राण जाए पर शान न जाए या हिंदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका देखील गाजल्या. 

टॅग्स :विजू माने