Join us  

किशोर प्रधान काका इतरांनाही आनंदी ठेवायचे - सुबोध भावे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 11:10 AM

अचूक टायमिंग आणि अभिनयाच्या कौशल्याने मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन झाले.

ठळक मुद्देसुबोध भावेने वाहिली श्रद्धांजली

अचूक टायमिंग आणि अभिनयाच्या कौशल्याने मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे अभिनयाच्या क्षेत्रातील एक चांगले कलाकार व व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सुबोध भावेने इंस्टाग्राम अकाउंटवर किशोर प्रधान यांच्यासोबतचा फोटो शेअर करून लिहिले की, किशोर प्रधान काका सतत आनंदी असलेले आणि इतरांनाही आनंदी ठेवणारे तुमच्यासारखा कलाकार विरळा. किती सहज काम करायचे तुम्ही. तुम्ही आमच्या चेहऱ्यावर आणलेले हसू कायम तुमची आठवण देत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली.

किशोर प्रधान यांचे 'शिक्षणाच्या आयचा घो', 'लालबाग परळ', 'भिंगरी', 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हे गाजलेले चित्रपट आहेत. 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटातील खट्याळ आजोबा, 'जब वुई मेट'मधील स्टेशन मास्तर या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. तसेच, दूरदर्शन वाहिनीवरील 'गजरा' कार्यक्रम त्यांनी पत्नी शोभासोबत सादर केला होता. प्रधान यांनी दीड डझनहून अधिक इंग्रजी नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. नाटकाच्या आवडीतून त्यांनी 'नटराज' ही संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून काही नाटकेही रंगभूमीवर आणली. त्याचबरोबर स्वत: अभिनय देखील केला. ‘हॅटखाली डोके असतेच असे नाही’, ‘मालकीण मालकीण दार उघड’, ‘हनिमून झालाच पाहिजे’ ‘जेव्हा यमाला डुलकी लागते’, ‘ती पाहताच बाला’, ‘ब्रह्मचारी असावा शेजारी’, ‘मालकीण मालकीण दार उघड’, ‘लागेबांधे’, ‘लैला ओ लैला’, ‘हनीमून झालाच पाहिजे’, ‘हँड्स अप’, ‘संभव असंभव’ अशा अनेक नाटकांतून त्यांनी एकापेक्षा एक भूमिका रंगवल्या होत्या. 

टॅग्स :सुबोध भावे