Join us  

चितळेंच्या केतकीने सांगितला आदर आणि औपचारिकतेतला फरक; म्हणाली, भाषेचा माज करू नका 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 3:14 PM

केतकी चितळेने शेअर केला नवा व्हिडीओ

ठळक मुद्देकेतकीने आपल्या पोस्टमध्ये  छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे केतकीला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारी अभिनेत्री केतकी चितळे अलीकडे प्रचंड ट्रोल झाली होती. नेटकºयांनी सोशल मीडियावर अक्षरश: तिला झोडपून काढले होते. याच केतकीने आता औपचारिकता आणि आदर यातील फरक समजवणारा व्हिडीओ शेअर केला आहे.  कुणाला अरे तुरे केल्याने आदर आहे आणि अहो जावो केल्याने आदर आहे, असे काहीही नाही, असे सांगत तिने आदर आणि औपचारिकता यातील फरक सांगितला आहे. आदर हा केला जात नाही. आदर कुठली काही गोष्ट नाही. ती एक भावना आहे. आदर वाटतो आणि तो मनात असतो. तो दाखवण्याची गरज नाही. अग तुग केल्याने अनादर करतो, असे नाही किंवा अहो जावो केल्याने आदर करतो असेही नाही. अहो जावो ही एक औपचारिकता आहे, असे केतकी या व्हिडीओत म्हणते.

पुढे ती मायबोली मराठीवर प्रेम करायला सांगते. मराठी भाषा एक गोड भाषा आहे. बरीच जण मराठीचा माज करतात, अभिमान बाळगा. पण अभिमान त्या गोष्टीचा बाळगा, जी तुम्ही स्वत:हून कमावलीय. भाषेचा अभिमान बाळगणे यात तुमचा काय रोल आहे? भाषेवर प्रेम करा. भाषा ही माज करण्यासारखी गोष्ट नाही. ती प्रेम करण्यासारखी गोष्ट आहे, असे केतकी यात म्हणतेय.

का झाली होती केतकी ट्रोल

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींनी तिच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. त्यानंतर मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये तिने महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता.‘ शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा,’ असे तिने या पोस्टमध्ये लिहिले होते.  

टॅग्स :केतकी चितळे