Join us  

केबीसीमुळे पालटले हर्षवर्धन नवाथेचे आयुष्य, मराठी अभिनेत्रीसह अडकलाय लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 6:30 PM

केबीसीचा पहिला विजेता म्हणून त्यांचं नाव साऱ्यांनाच माहित आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हर्षवर्धन 2007 साली रेशीमगाठीत अडकले.

केबीसीमुळे जीवन पालटणा-यांमध्ये आवर्जून उल्लेख करावा लागले पहिलावहिला करोडपती म्हणजेच मराठमोळ्या हर्षवर्धन नवाथे यांचा.अवघ्या 23 मिनिटांत 15 प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन हर्षवर्धन रातोरात कोट्यधीश बनले. १९ वर्षांपूर्वी हर्षवर्धन यांनी केबीसीचे विजेतेपद पटकावत नवा इतिहास रचला होता. विजेतेपद पटकावल्यानंतर मुंबईकर असणाऱ्या हर्षवर्धन यांची आजही मुंबईशी नाळ घट्ट जोडलेली आहे. या शोनं हर्षवर्धन यांना नवी ओळख मिळवून दिली. आज त्यांना प्रत्येकजण ओळखत नसला तरी केबीसीचा पहिला विजेता म्हणून त्यांचं नाव साऱ्यांनाच माहित आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हर्षवर्धन 2007 साली रेशीमगाठीत अडकले.

हर्षवर्धनचे 29 एप्रिल 2007 रोजी सारिका नीलत्करसोबत लग्न करत आयुष्याची नवी सुरूवात केली. सारिका ही मराठी अभिनेत्री असून तिनं मराठी सिनेमा, टीव्ही मालिका आणि रंगभूमीवर काम केलं आहे. 'चाणक्य', 'जास्वंदी' या नाटकांत सारिकानं भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय दूरदर्शनवरील 'गुलाम-ए-मुस्तफा' या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. 2012 मध्ये आलेल्या 'अजिंक्य' या सिनेमातही सारिका झळकली होती.

'पहिली शेर दुसरी सवाशेर' 'नवरा पावशेर' या सिनेमात सारिका अभिनेता अशोक सराफ यांच्यासोबत काम केलं होतं. तर 2008 मध्ये संदीप कुलकर्णींसह 'एक डाव संसारा'चा या सिनेमातही काम करण्याची संधी सारिकाला लाभली. सारिका आणि हर्षवर्धन यांचे अरेंज मॅरेज आहे. आईवडिलांनी निवडलेल्या मुलीसोबत हर्षवर्धन यांनी लग्न केले. या दाम्पत्याला दोन मुलं असून एकाचं नाव सारांश तर दुस-याचं रेयांश असं आहे.

हर्षवर्धन नवाथे सध्या महिंद्रा अँड महिंद्राच्या CSR & एथिक्स डिपार्टमेंटमध्ये काम करतात. २००५ पासून या कंपनीत काम करत आहेत. हर्षवर्धन जेव्हा केबीसी जिंकले त्यावेळी ते विद्यार्थी होते. त्यावेळी ते युपीएससीची तयारी करत होते. आयएएस होऊन देशाची सेवा करण्याचं त्यांचं स्वप्न होतं.

मात्र केबीसी जिंकल्यानंतर त्यांचं आयुष्य खूप पालटलं. युपीएससीच्या परीक्षेवरील त्यांचं लक्ष काहीसं कमी झालं. मात्र त्यांनी त्यांचं स्वप्न बदललं नाही. सध्या कार्पोरेट सेवेत असलेले हर्षवर्धन सामाजिक संस्थांसोबतही काम करतात. युपीएससीसी त्यांच्या डोक्यात एमबीए करण्याचा विचारही होता.

 

मात्र त्याचा खर्च त्यांना पेलवणारा नव्हता. मात्र केबीसी जिंकल्यानंतर त्यांनी इंग्लंडला जाऊन एमबीए केलं. त्यानंतर काही ठिकाणी काम करून ते मुंबईत परतले. गेल्या 20 वर्षांपासून ते मुंबईतच राहतायत आणि काम करतायत. 

टॅग्स :हर्षवर्धन नवाथेकौन बनेगा करोडपती