रवी जाधव दिग्दर्शित टाइमपास या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. या चित्रपटातील प्राजू आणि दगडूच्या भूमिकेने प्रेक्षकांना वेड लावून ठेवले होते. मात्र या चित्रपटातील या जोडीच्या भूमिकेव्यतिरिक्त अजून ही एक होता ज्यामुळे या चित्रपटात जान आली होती. साहजिकच दगडूची मित्रमंडळी असणार. याच मित्रमंडळातील 'परली रे परली दादूसची विकेट परली' म्हणत आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता जयेश चव्हाण सध्या हिंदी लघुपटामध्ये झळकत असल्याचे दिसत आहे. या लघुपटाचे नाव 'दि मिलेनियर' असे आहे. या लघुपटात तो प्रेक्षकांना चहावाल्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याच्या या भूमिकेचे नाव राजू असणार आहे. या लघुपटाची कथा राजू भोवती फिरणारी असणार आहे. एखाद्याकडे पैसा असल्यावर त्याच्यामागे जग कसे धावते याचे चित्रण 'द मिलेनियर' या लघुपटात पाहायला मिळणार आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन दिपक पवार यांनी केले आहे. तसेच सध्या सोशल मीडियावर 'द मिलेनियर' या हिंदी लघुपटाला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. टाइमपासमधील जयेशच्या भूमिकेने प्रेक्षकांना खळखळून हसविले होते. त्याच्या त्या भूमिकेने आज ही प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. त्याच्या या अभिनयामुळेच सध्या त्याच्याजवळ भरपूर चित्रपटांचे ऑफरदेखील आहेत. तो भविष्यात 'पटरी बॉइज' , '३५ टक्के काठावर पास' , 'कलाकेंद्र' आणि 'इपितर' या चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे जयेशची गाडी सध्या सुसाट धावत असल्याचे दिसत आहे.
जयेश झळकणार कोणत्या लघुपटात ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 18:24 IST