Join us  

जय मल्हार फेम देवदत्त नागे किल्ल्यांच्या संवर्धनासाठी करतोय हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 5:26 PM

रेवदंडा येथील कोर्लईच्या किल्ल्यात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पेण आणि अलिबाग येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्फत तोफगाडा दुर्गार्पण सोहळा पार पडला.

ठळक मुद्देसह्याद्री या संस्थेने मुरुड येथील कोर्लईच्या किल्ल्यात नुकताच तोफगाडा दुर्गार्पण सोहळा पार पाडला. या सोहळ्याला मला उपस्थित राहाता आले याचा मला प्रचंड आनंद होत आहे.

आपल्या महाराष्ट्रात अनेक गड-किल्ले आहेत. किल्ल्यांचे जतन-संवर्धन करणे हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. पण गेल्या काही वर्षांत या गड-किल्ल्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे. किल्ले पाहायला आलेली मंडळी अनेकवेळा किल्ल्यांमध्येच खाल्लेल्या गोष्टींचा कचरा फेकतात. ही किल्ल्यांवरील अस्वच्छता बघून आपल्यालाच अनेकवेळा वाईट वाटते. आज महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. आजमितीला अनेक संस्था किल्ले संवर्धनाचे कार्य करत आहेत. अशाच एका संस्थेद्वारे नुकताच तोफगाडा दुर्गार्पण करण्यात आले.

रेवदंडा येथील कोर्लईच्या किल्ल्यात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पेण आणि अलिबाग येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्फत तोफगाडा दुर्गार्पण सोहळा पार पडला. या प्रतिष्ठानाचे श्रमिक गोजमगुंडे, समीर म्हात्रे यांनी यासाठी मेहनत घेतली. तसेच नागावचे सरपंच निखिल मयेकर यांनी देखील मदत केली. यावेळी जय मल्हार फेम देवदत्त नागे आवर्जून उपस्थित होता. त्याच्या उपस्थित भंडारा उधळून, तोफांची पूजा करत तोफगाडा दुर्गार्पण करण्यात आले. याविषयी देवदत्त सांगतो, आपल्या महाराष्ट्रातील सगळेच किल्ले हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. मी अनेक वर्षं किल्ल्यांवर ट्रेकिंगला जात आहे. त्यामुळे किल्ल्यांची दुरावस्था मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे. 

मी नेहमीच किल्ले स्वच्छ करण्यासाठी माझ्या परीने प्रयत्न करत असतो. किल्ल्यांवर अनेकवेळा कचरा टाकला जातो. वास्तूची नासधूस केली जाते. एक सुजाण नागरिक म्हणून आपण असे करता कामा नये. किल्ले ही आपली संपत्ती आहे आणि त्याचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे असे आपण सगळ्यांनी मानले पाहिजे. पूर्वीच्या लढायांमध्ये तोफा सगळ्यात महत्त्वाचे कार्य बजावायच्या. त्यामुळे आपल्या प्रत्येक गड-किल्ल्यांवर तोफा पाहायला मिळतात. पण किल्ले पाहायला जात असलेले काही लोक या तोफांवर आपले पाय ठेवत असल्याचे, अथवा त्यावर ते बसत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. अनेक किल्ल्यांवर तोफा अतिशय वाईट परिस्थितीत आहेत. अनेक संस्थांद्वारे यांचे संवर्धन करण्याचे प्रयत्न केले जातात. 

सह्याद्री या संस्थेने मुरुड येथील कोर्लईच्या किल्ल्यात नुकताच तोफगाडा दुर्गार्पण सोहळा पार पाडला. या सोहळ्याला मला उपस्थित राहाता आले याचा मला प्रचंड आनंद होत आहे. विशेष म्हणजे मला या कार्यक्रमाला कोणीही आमंत्रण दिलेले नव्हते. पण सह्याद्री प्रतिष्ठानाचे हे काम मला आवडल्याने मी तिथे जाण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :देवदत्त नागे