Join us  

'स्टार झालेल्या नट्यांचे नखरे आवडत नाहीत, पण…'; सोनाली कुलकर्णीला उद्देशून लिहिलेली विजू मानेंची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 11:04 AM

दिग्दर्शक विजू माने (Viju Mane) यांनी सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) साठी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni)चा नुकताच पांडू (Pandu Movie)हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात सोनालीसोबत भाऊ कदम आणि कुशल बद्रीके दिसले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने (Viju Mane) यांनी सोनालीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे.

विजू माने यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सोनालीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि म्हटले की, पांडू सिनेमाच्या निमित्ताने...ठाण्यात एक इव्हेंट करत होतो. इवेंटमध्ये 'ती' (सोनाली कुलकर्णी) परफॉर्म करणार होती. तिच्यासोबत तिची आई सगळीकडे असायची. टिपिकल हीरोइन की मम्मी वाटायचं मला. मी इव्हेंट लिहीला आणि डिरेक्ट केला पण त्यावेळेला काही आमचं संभाषण होऊ शकलं नाही. पांडूच्या कास्टिंगबद्दल चर्चा सुरू असताना अचानक अश्विन पाटीलने तिचे नाव काढलं. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर तिचं नाव येता क्षणी मी हंड्रेड पर्सेंट कन्व्हिन्स्ड नव्हतो. पण झी स्टुडीओजचे सर्वेसर्वा मंगेश कुलकर्णी आणि अश्विन यांनी मला पटवून दिलं. मी कन्व्हीन्स नसण्याचं कारण मला स्टार पदाला पोहोचलेल्या नट्यांचे नखरे आवडत नाहीत. सिनेमातल्या कॅरेक्टर पेक्षा यांच्या कॅरेक्टरवर अधिक बोललं जातं. सगळ्या पर्यायांमधून शेवटी एकदाचं तिचं कास्टिंग झालं, सिनेमा झाला, आणि ही पोरगी आपली एकदम झक्कास मैत्रीण झाली.

सोनाली कुलकर्णीचे कौतुक करताना विजू माने म्हणाले की, खरंच स्टारपद असलेल्या हीरोइन बद्दल बऱ्या-वाईट चर्चा कायमच होत असतात. तो त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे. पण मी सोनालीबद्दल का कोण जाणे थोडं वाईटच असं ऐकून होतो. सेटवर खूप त्रास देते, दिग्दर्शकाला स्वतःच्या सूचना देते. पहिला दिवस शूटिंगचा येईपर्यंत मला सतत असं वाटायचं, की माझ्या आणि तिच्यात सेटवर खटके उडणार. पण सेट वरच्या पहिल्या शॉट पासून ते प्रमोशन च्या शेवटच्या दिवसापर्यंत आमच्यात वादाचा असा मुद्दाच आला नाही. मुळात ती माझ्या अपेक्षेपेक्षा अत्यंत वेगळी होती. सेटवर कधीही एक सेकंद देखील उशिरा पोहोचली नाही. उलट दिलेल्या वेळेच्या पंधरा मिनिटे तरी आधी ती कुठेही हजर असते. मग ती मीटिंग असो, शिबिर असो, फोटो सेशन असो, डान्स असो, किंवा शूटिंग असो. आपण सेटवर असताना इतर कुठल्याही गप्पा न मारता, केवळ आपल्या सिनेमातील कॅरेक्टरबद्दल गप्पा मारायची.

सोनालीच्या या गोष्टीचं वाटतं अप्रूप

ते पुढे म्हणाले की, खरंतर, उषा कॅरेक्टरचे कॉश्च्युम डिझाइन करताना तिने खूप जास्त मेहनत घेतली आहे. उषाच्या नाकातल्या नोज रिंग पासून, ते तिच्या साडीच्या पदराला असलेल्या गाठीपर्यंत तिने स्वतः विचारविनिमय करून बनवल्यात. प्रसंगी स्वतःचे कपडेदेखील तिने सिनेमात वापरले आहेत. शिवाय वजन कमी करून ती गाण्यात लाजवाब दिसली आहे. सिनेमासाठी पॅशेनेटली काम करणारी अभिनेत्री आहे ही आणि जितकी सिनेमाच्या रोल बाबतीत गंभीर, तितकीच सेटवरच्या कुरापतीमध्ये लबाड आणि खट्याळ. एखाद्याचा आपण पाणउतारा केलाय हे त्याला नकळता आजूबाजूच्यांना दाखवून देण्याची तिच्यात 'विशेष' कला आहे. तिच्या आणखी एका गोष्टीचं फार अप्रूप वाटतं, ते म्हणजे प्रोफेशनलिझम.

टॅग्स :सोनाली कुलकर्णीविजू माने