Join us

'अजून किती दिवस बायकांना तुम्ही बंधनात ठेवणार?', हेमांगी कवीला ट्रोल करणाऱ्यांवर चित्रा वाघ संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 18:00 IST

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी किती दिवस आपण बाईच्या दिसण्यावर चर्चा करणार आहोत, तिच्या असण्यावर काही चर्चा करणार आहोत की नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.

अभिनेत्री हेमांगी कवी सध्या तिच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या फेसबुकवरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. या पोस्टवरुन सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा ऐकायला मिळते आहे. हेमांगी कवीच्या पोस्टवर काही सेलिब्रेटींनी कमेंट करत तिच्या मताला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, नुकतेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी किती दिवस आपण बाईच्या दिसण्यावर चर्चा करणार आहोत, तिच्या असण्यावर काही चर्चा करणार आहोत की नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. हेमांगीने शेअर केलेल्या पोळ्या लाटण्याच्या व्हिडीओमध्ये ट्रोलर्सची नजर नको तिथे होती, त्यावर इतक्या घाणेरड्या कमेंट्स आल्या, त्याबद्दल चित्रा वाघ यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की, ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीचे अभिनय कौशल्य किंवा वेगवेगळ्या व्हिडिओमधून ती सामाजिक प्रश्न मांडते, ते दिसत नाही का? आजही आपण बाईच्या दिसण्यावर चर्चा करणार आहोत का? तिच्या असण्यावर काही चर्चा करणार आहोत की नाही? तिच्या कर्तृत्वावर काही चर्चा करणार आहोत की नाही? अजून किती दिवस बायकांना तुम्ही बंधनात ठेवणार आहात? 

त्या पुढे म्हणाल्या की, एक अतिशय साधा पोळ्या लाटतानाचा व्हिडिओ हेमांगीने शेअर केला होता. त्यावर इतक्या वाईट कमेंट्स आल्या. लोकांची जी नजर आहे, ती सुधारण्याचे काही नावच घेत नाही. इंस्टाग्राम हे एक मनोरंजनाचे प्लॅटफॉर्म आहे. त्यावर वेगवेगळे विषय घेऊन ती येत असते. त्या पोळ्या लाटण्याच्या इंस्टाग्राम पोस्टवरुन, त्याच्यावर नजर न टाकता, नको त्या गोष्टींवर बारकाईने पाहणे, त्यावर अश्लील लिहिणे, म्हणजे लोकांनी सगळ्या पातळ्या गाठलेल्या आहेत, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.

ही ट्रोलर्स मंडळी बऱ्याच अभिनेत्रींच्या सोशल मीडिया अकाउंटवर इतके अश्लील आणि घाणेरडे कमेंट्स लिहितात, की त्या मुली ही वाचू शकणार नाहीत, पण या गोष्टीला फार महत्त्व देण्याची गरज नाही, असे मतदेखील यावेळी त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :हेमांगी कवीचित्रा वाघ